जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथून जवळच असलेल्या डोंगराच्या कुशीत निसर्गरम्य वातावरणात वसलेल्या त्रिकुटा माता देवीचे प्राचीन काळातील छोटेसे मंदिर आहे. आख्यायिका अशी आहे की, त्रिकुटा माता या ठिकाणी स्वयंभू प्रगट झालेली आहे. जुन्या जाणत्यांच्या सांगण्यानुसार चारशे वर्षांपूर्वीची तांदळा जसे वैष्णवी मातेचे तीन तांदळे आहेत. त्याच प्रकारे हे ही तीन तांदळे श्री महाकाली, महालक्ष्मी, व महासरस्वती माता आहे.
आजपर्यंत येथे खुप घनदाट जंगल होते. परंतु पंचवीस ते तीस वर्षांपासून परिसरातील सर्व भक्त यांनी येथे वेगवेगळे उपक्रम चालू केले आहे. हे मंदिर टेंभूर्णीपासून पूर्वेला पापळच्या दिशेने दोन किलोमीटर गडावर असल्यामुळे येथे नैसर्गिक वातावरणाचा अनुभव पण घेता येतो. मंदिर परिसरात या काळात रंगरंगोटी सुशोभिकरण करण्यात आले असून, विद्युत रोषणाईने हा परिसर भाविकांचे आकर्षण बनला आहे. अतिशय शांत असे हे ठिकाण आहे. मंदिर परिसरात येणाऱ्या भाविक भक्तासाठी पाण्याची व्यवस्था केलेली असल्याने पशू, पक्षी, यांचा देखील चिवचिवाट अनुभवयास मिळत आहे. डोंगराच्या कुशीत असल्यामुळे भरपूर झाडी, निसर्गरम्य वातावरण, स्वतःला एकातंत झोकून दिल्याचा अनुभव झाल्याची प्रचिती येते. वर्षभर सकाळी पाच वाजता मातेचे नित्यनेमाने पूजा-अर्चा, आराधना केली जाते. वर्षातून चार नवरात्र उत्सव साजरा केला जातो. शारदीय नवरात्रात रोज सकाळी गावातून भव्य दिव्य अशी मशाल रॅलीचे आयोजन करून त्रिकुटा माता गडावर सर्व महिला मंडळ व भक्त मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होतात. रॅली रोज सकाळी पाच वाजता गावाला फेरी मारून त्रिकुटा माता गडावर जाते. मशाल रॅलीमध्ये नऊ दिवस रोज एका मुलीला नवोदयपैकी प्रत्येकी एक एक देवीचे रूप दिले जाते. त्यानंतर गडावर आल्यावर पूजा-अर्चा, आरती होते. मंदिर परिसरात येणाऱ्या भाविक भक्तांसाठी साबुदाणा खिचडी, फराळ याचे वाटप केले जाते. त्यानंतर लगेच सप्तशतीच्या पाठाला आरंभ होतो. सायंकाळी सात वाजता परत आरती होऊन नंतर भजनाचा कार्यक्रम होत असतो. त्रिकुटा माता देवी म्हणजे भक्ताच्या नवसाला पावणारी देवी असा अनुभव या भागातील भाविक सांगतात. आणि इथे आल्यानंतर खरोखरच मंदिरात आल्यावर तिन्ही माता साक्षात आपल्या समोर असल्याचे अनुभूती येते.
मंदिर परिसरात रोज दीपमाळीचे प्रज्वलन होते. यावर्षीचा विशेष उपक्रम म्हणजे सर्व भक्तांनी मिळून तुळजापूर येथून ‘दिव्य अखंड मशाल ज्योत’ पायी चालत आणली. गावचे ग्रामदैवत रेणुका माता येथे पूजन करून नंतर गावात मिरवणूक काढून पूजा करून त्रिकुटा माता गडावर आणल्या नेली व येथे अखंड नऊ दिवस तेवत राहिली.