पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये रविवारी रात्री तृणमूल काँग्रेसच्या (TMC) कार्यकर्त्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या हत्येत भाजपचा हात असल्याचा आरोप टीएमसीने केल्याने या घटनेने परिसरात तणाव निर्माण झाला आहे. तर भाजपने आरोप ठामपणे फेटाळले आहेत.
दूधचा व्यापारी आणि तृणमूल कार्यकर्ता सनातन घोष, रविवारी रात्री गझनीपूरहून पारा गावात मोटारसायकलवरून घरी परतत असताना हल्लेखोरांनी त्याला थांबवले आणि जवळून गोळ्या झाडल्या, अशी माहिती स्थानिक सूत्रांनी दिली आहे.
बंदुकीच्या गोळ्या आणि किंचाळण्याच्या आवाजाच्या दिशेने धावत गेलेल्या स्थानिक रहिवाशांना तो रक्ताच्या थारोळ्यात सापडला. त्याला तात्काळ हरिहरपारा ब्लॉक प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्याला बहरमपूरच्या मुर्शिदाबाद मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये पाठवले.
गोळीबाराच्या अनेक जखमा झाल्यानंतर गंभीर अवस्थेत असलेल्या घोष यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
घोष यांच्या हत्येत भाजपचा हात असल्याचा आरोप स्थानिक तृणमूल कार्यकर्त्यांनी केला आहे. ‘या हत्येमागे भाजपचा हात असू शकतो कारण गेल्या निवडणुकीत त्याने पक्षासाठी चांगले काम केले’, असे घोष यांच्या जवळच्या तृणमूल कार्यकर्त्याने सांगितले.
भाजपच्या नेत्यांनी सारे आरोप फेटाळले आहेत.
पोलीस तपास सुरू आहे. जुन्या वैमनस्यातून आणि जमिनीच्या वादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक तपासात अंदाज आहे. घोष यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे.