
खून, खंडणी, हाणामारी, बलात्कार, दरोडे, हुंडाबळीच्या वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे सुसंस्कृत अशी ओळख असणाऱ्या पुणे शहराला गुन्हेगारीचे गालबोट लागले आहे. आज शिरूर तालुक्यातील रांजणगावच्या हद्दीत एका महिलेसह तिच्या दोन चिमुकल्या लेकरांचे जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने पुणे जिल्हा हादरला आहे.
शिरूर तालुक्यातील खंडाळा माथ्याजवळील रांजणगावच्या हद्दीत 25 ते 30 वयोगटातील महिला आणि तिचा चार वर्षांचा मुलगा तसेच दीड वर्षाच्या मुलीचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळला. ग्रोवेल कंपनीच्या मागील बाजूस हे तीन मृतदेह आढळले. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. मात्र, प्राथमिक तपासणीत मृत महिलेच्या उजव्या हातावर ‘जय भीम’ असे गोंदलेले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या घटनेची माहिती मिळताच, रांजणगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू केला आहे. तिघांचेही मृतदेह जळालेले असल्याने ओळख पटविणे जिकिरीचे झाले आहे. पोलिसांनी परिसरातील हरवलेल्या व्यक्तींबाबत माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे.