श्री क्षेत्र नृसिंहवाडीमध्ये कार्तिक पोर्णिमा उत्साहात साजरी

587

श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात मंगळवारी कार्तिक म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी झाली. श्री दत्त चरणांच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. सायंकाळी पौर्णिमेच्या चंद्राच्या प्रकाशात भाविकांनी व संस्थानने  कृष्णा-पंचगंगा काठावर लावलेल्या असंख्य दिव्यांनी मंदिर परिसर असंख्य दिव्यांनी उजाळून निघाला.

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त मंदिरात पहाटे साडेचार वाजता काकड आरती व षोडशोपचार पूजा, सकाळी आठ वाजता पंचामृत अभिषेक, दुपारी साडेबारा वाजता श्रींचा चरणकमलावर महापूजा, तीन वाजता पवमान पंचसूक्त पठण, रात्री साडे आठ वाजता धूप, दीप, आरती व पालखी सोहळा आणि शेजारती असे कार्यक्रम झाले. येथील दत्त देव संस्थान मार्फत कापडी मंडप,  दर्शनरांग, मुखदर्शन,क्लोज सर्किट व्यवस्था,पिण्यासाठी शुद्ध पाणी, तसेच मोफत महाप्रसादाची सोय केली होती. सुमारे दहा ते बारा हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. पौर्णिमेच्या आदल्या दिवशी रात्रीपासूनच भाविक पायी, दुचाकी, चारचाकी वाहनाने श्रींच्या दर्शनासाठी येत होते.  सायंकाळी सहानंतर मुख्य मंदिराच्या दक्षिणोत्तर घाटावरती भाविकानी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्य दिवे लावण्यास सुरवात केली.रात्री उशिरापर्यंत दीपोत्सव व भाविकांची वर्दळ चालू होती. ग्रामपंचायत व संस्थान मार्फत भाविक व यात्रेकरुंसाठी विविध सोयी व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.

 

आपली प्रतिक्रिया द्या