नगर-दौंड महामार्गावर हिवरे झरे (ता. नगर) गावाजवळ आज सकाळी मालट्रक आणि मारुती-सुझुकी कंपनीची इर्टिगा कार यांची धडक झाली. या अपघातात कारमधील एका युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य चौघे जखमी झाले. मयत व जखमी हे सर्वजण छत्रपती संभाजीनगरचे रहिवासी आहेत.
आदेश डाकरे (वय 27) असे मयत युवकाचे नाव आहे. मयूर कुदळे, अभिजीत बच्छिरे, हरीश घडामोडे व समरजित मनसिरे अशी जखमींची नावे आहेत. हे सर्वजण इर्टिगा कारने नगरहून दौंडकडे जात होते. आज सकाळी हिवरे झरे (काळेवाडी) शिवारात दौंडकडून भरधाव नगरकडे येत असलेल्या मालट्रकची आणि कारची समोरासमोर धडक झाली. या अपघातामध्ये कारचा चक्काचूर झाला.
अपघातानंतर सर्व तरुण कारमध्येच अडकून पडले होते. त्यांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक नागरिक नारायण रोडे, तुषार पवार, शैलेश काळे, पिंटू काळे, नितीन काळे, बापू काळे, राहुल काळे, सुभाष काळे यांनी मदत केली. या अपघाताची माहिती मिळाल्यावर शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रुग्णवाहिका तसेच वाहने रस्त्याच्या बाजूला काढण्यासाठी क्रेन बोलावली.
अपघाताची माहिती मिळाल्यावर नगर तालक्याचे पोलीस उपनिरीक्षक अस्लम पठाण, राहुल द्वारके हे दाखल झाले. पोलिसांनी मालट्रक चालक सलीम मोहम्मद (रा. मणिपूर) याला ताब्यात घेतले आहे.
महामार्गावरील खड्ड्यांमुळे पुन्हा एक बळी
नगर-दौंड महामार्ग मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. महामार्गावरील खड्ड्यांमुळे पुन्हा एकाचा बळी गेला आहे. महामार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यात पावसाळा सुरू असल्याने प्रवाशांच्या अडचणीत अधिकच भर पडत असून, अपघातही वाढले असल्याने महामार्गावरील खड्डे त्वरित बुजवावेत, अशी मागणी शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले यांनी केली आहे.
आठवड्यात दुसरा अपघात
नगर-दौंड महामार्गावर बाबुर्डी बेंद फाटय़ावर मागील आठवड्यात खासगी आराम बस उलटून दोघांचा मृत्यू, तर 5-6 प्रवासी जखमी झाले होते. ही घटना ताजी असतानाच आज सकाळी पुन्हा भीषण अपघात झाल्याने नगर-दौंड महामार्ग मृत्यूचा सापळाच बनला आहे.