
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे अब्जाधीश सहकारी एलॉन मस्क यांच्यातील संबंध बिघडल्यानंतर काही महिन्यांनी एका सर्वेक्षण अहवाल प्रसिद्ध झाला आहे. या सर्वेक्षण अहवालामध्ये एलॉन मस्क हे ‘सार्वजनिक स्तरावर अमेरिकेतील सर्वात अप्रिय व्यक्ती’ असल्याचे समोर आले आहे. मात्र हा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी एलॉन मस्क यांचा बचाव केला आहे. जागतिक संशोधन संस्था ‘गॅलप’ने केलेल्या एका सर्वेक्षणानुसार, मस्क यांची लोकप्रियता जानेवारीपासून २४ टक्क्यांनी घसरली आहे, ज्यामुळे ते अमेरिकेतील सर्वात अप्रिय प्रसिद्ध व्यक्ती बनले आहेत.
या सर्वेक्षणाबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ट्रम्प एका रिपोर्टरला म्हणाले, ‘ते सर्वेक्षण अचूक आहे का याबद्दल मला माहित नाही. मला वाटते ते एक चांगले व्यक्ती आहेत. मला वाटते त्यांच्या आयुष्यात काही वाईट क्षण आले, खूपच वाईट क्षण. पण ते एक चांगले व्यक्ती आहेत. माझा त्यावर विश्वास आहे.’
७ जुलै ते २१ जुलै दरम्यान झालेल्या या सर्वेक्षणात, गॅलप संस्थेने १,००० अमेरिकन नागरिकांना १४ प्रमुख व्यक्तींची लोकप्रियता तपासण्यास सांगितले होते. या यादीत इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू, ज्यांच्यावर गाझामधील इस्रायलच्या कारवाईसाठी माणुसकीविरुद्धच्या गुन्ह्यांचे आरोप आहेत, तसेच युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की, जो बायडेन आणि पोप लिओ १४ यांचाही समावेश होता.
जानेवारीमध्ये मस्क ४ क्रमांकावर होते, जे जुलैमध्ये -२८ पर्यंत खाली आले. टेस्लाच्या बॉसला सर्वात शेवटचे स्थान मिळाले, ज्यात ६१ टक्के लोकांनी त्यांच्याबद्दल नकारात्मक मत व्यक्त केले. मात्र, मोठ्या संख्येने नकारात्मक प्रतिक्रिया असूनही, ३३ टक्के लोकांना मस्क आवडतात, तर सहा टक्के लोकांनी त्यांच्याबद्दल तटस्थ मत नोंदवले आहे.
ट्रम्प आणि मस्क यांचे संबंध
ट्रम्प राष्ट्राध्यक्ष असताना एकेकाळी ‘फर्स्ट बडी’ चा दर्जा उपभोगलेल्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीची, रिपब्लिकन पक्षाच्या महत्त्वाच्या कर आणि खर्च विधेयकावर टीका केल्यानंतर, अचानक हकालपट्टी झाली. जूनमध्ये त्यांच्यात मोठा वाद झाला होता, ज्यात दोघांनीही सोशल मीडियावर एकमेकांवर जोरदार टीका केली.
मस्क यांनी आरोप केला होता की, बदनाम आर्थिक गुन्हेगार आणि लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीनशी संबंधित फायली ट्रम्प प्रशासन सार्वजनिक करत नाही, कारण ट्रम्प यांचे नाव त्या फायलींमध्ये आहे. त्यावर अध्यक्षांनी दक्षिण आफ्रिकेत जन्मलेल्या या व्यावसायिकाला ‘जिथून आला आहेस तिथे परत जा’ असे प्रत्युत्तर दिले होते. मात्र आता पुन्हा एकदा ट्रम्प यांनी मस्क यांच्याबद्दल चांगले मत व्यक्त केल्याने दोघांमधील संबंध म्हणजे, ‘तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना!’ असे असे असल्याचे बोलले जात आहे.