
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यातील शस्त्रसंधीत मध्यस्थी केली असल्याचा दावा केला आहे. यावरून कॉंग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी म्हटले आहे की, “पंतप्रधान मोदींची ५६ इंचांची छाती आता आखडली आहे. ट्रम्प यांच्या दाव्यावर त्यांनी पुन्हा मौन बाळगले आहे.”
जयराम रमेश यांनी X वर ट्रम्प यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “ट्रम्प यांनी APEC सीईओ शिखर परिषदेत हिंदुस्थान आणि पाकिस्तानमधील युद्ध रोखल्याचे सांगितले. पण ५६ इंचाची छाती असलेले शांत आहे त्यांची छाती आता आखडली आहे.”
ते म्हणाले, “ट्रम्प यांनी सातत्याने असा दावा केला आहे की, त्यांनी व्यापार कराराबाबत हिंदुस्थानवर दबाव आणला होता. परंतु जेव्हा आम्ही संसदेत चर्चेची मागणी केली तेव्हा पंतप्रधान मोदींनी काहीही सांगितले नाही.”




























































