अमेरिकेतील वकील, राजकीय पक्ष तसेच कार्यकर्त्यांसह जनतेलाही ट्रम्प यांनी एक्सवरून धमकी दिली आहे. राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर मतदानात फेरफार केल्याचे आढळले किंवा बेईमानी केल्याचे समोर आले तर त्यांना थेट तुरुंगात टाकून त्यांच्याविरोधात खटला चालवण्याची धमकी डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर सरकारच्या अधिकारांचा पूर्णपणे वापर करणार असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
मी अनेक वकिलांसोबत तसेच कायद्यातील तज्ञांसोबत 2024 च्या राष्ट्राध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीची प्रक्रिया, पवित्रता खूप जवळून पाहत आहे. 2020 मध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमेक्रोट्सद्वारे मोठय़ा प्रमाणावर करण्यात आलेली फसवणूक मला माहीत आहे, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.
स्थलांतरितांना परत पाठवणार
अमेरिकेत अवैधरीत्या प्रवेश करणाऱ्यांना स्थलांतरितांना आपण राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर परत त्यांच्या देशात पाठवणार, अशी धमकीही ट्रम्प यांनी दिली आहे. रविवारी निवडणूक प्रचारसभेत 100 मिनिटांच्या भाषणात त्यांनी अमेरिकेतील स्थलांतरितांविरोधात संताप व्यक्त केला. विविध देशांमधून अमेरिकेत तब्बल 100 मिलियन नागरिक अवैधरीत्या स्थलांतर करतात. त्यामुळे अमेरिकेची लोकसंख्या फुगत चालली असून अमेरिकेची लोकसंख्या तब्बल 30 टक्क्यांनी वाढली आहे, असेही ट्रम्प म्हणाले.