‘बोर्ड ऑफ पीस’ला नकार दिल्यास फ्रान्सवर २०० टक्के टॅरिफ लावू; ट्रम्प यांचा इमॅन्युएल मॅक्रॉन यांना इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
Trump Threatens 200% Tariffs on French Wine Over Board of Peace & Greenland Dispute

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना थेट इशारा दिला आहे. ट्रम्प यांनी प्रस्तावित केलेल्या ‘बोर्ड ऑफ पीस’ (Board of Peace) या जागतिक शांतता उपक्रमात सहभागी होण्यास फ्रान्सने नकार दिल्यास, फ्रेंच वाईन आणि शॅम्पेनवर २०० टक्के आयात शुल्क (Tariff) आकारण्याची धमकी ट्रम्प यांनी दिली आहे.

युद्धग्रस्त गाझाच्या पुनर्बांधणीवर लक्ष ठेवण्यासाठी ट्रम्प यांनी ‘बोर्ड ऑफ पीस’ स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला आहे. मात्र, फ्रान्सने या उपक्रमात सहभागी होण्याबाबत निरुत्साह दाखवला असून ट्रम्प यांचे निमंत्रण नाकारण्याचे संकेत दिले आहेत. यावरून भडकलेल्या ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘ट्रुथ सोशल’वर मॅक्रॉन यांच्यावर निशाणा साधला. ‘मी त्यांच्या वाईन आणि शॅम्पेनवर २०० टक्के टॅरिफ लावेन, मग ते नक्कीच सहभागी होतील,’ असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

ग्रीनलँडवरून वाद चिघळला

हा वाद केवळ शांतता मंडळापुरता मर्यादित नसून ग्रीनलँडच्या मुद्द्यावरूनही दोन्ही नेत्यांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. डोनल्ड ट्रम्प यांनी मॅक्रॉन यांनी पाठवलेला एक खाजगी संदेश सार्वजनिक केला आहे. या संदेशात मॅक्रॉन यांनी इराण आणि सीरियाच्या मुद्द्यावर सहमती दर्शवली असली तरी, ‘तुम्ही ग्रीनलँडबाबत नेमके काय करत आहात, हे मला समजत नाहीये’, असे विचारत ट्रम्प यांच्या ग्रीनलँड खरेदीच्या इच्छेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

मॅक्रॉन यांची डिनरची ऑफर दरम्यान, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी ट्रम्प आणि इतर G7 नेत्यांना दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेच्या (WEF) निमित्ताने भेटण्याचे आवाहन केले आहे. या बैठकीसाठी त्यांनी युक्रेन, रशिया आणि डेन्मार्कच्या नेत्यांनाही आमंत्रित करण्याची तयारी दर्शवली आहे. तसेच, त्यांनी ट्रम्प यांना गुरुवारी रात्री डिनरसाठी एकत्र येण्याची ऑफरही दिली आहे. आता ट्रम्प यावर काय भूमिका घेतात, याकडे जगाचे लक्ष लागले आहे.