अमेरिकेतील ‘DOGE’ आठ महिने आधीच बंद; ट्रम्प यांच्या विभागावर प्रश्नचिन्ह

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सरकारी खर्च आणि आकार कमी करण्याच्या उद्देशाने मोठ्या उत्साहाने सुरू केलेले ‘डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी’ (DOGE) हे कार्यालय त्याचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच आठ महिने आधी बंद करण्यात आले आहे.

या विभागाच्या स्थितीबद्दल विचारले असता, ‘ऑफिस ऑफ पर्सनल मॅनेजमेंट’ (OPM) चे संचालक स्कॉट कुपोर यांनी धक्कादायक खुलासा करत सांगितले की, ‘असं काही अस्तित्वात नाही.’ DOGE आता ‘केंद्रीकृत अस्तित्व’ राहिलेले नाही आणि त्याची अनेक कार्ये OPM कडे सोपवण्यात आली आहेत, असे कुपोर यांनी स्पष्ट केले.

जानेवारीमध्ये स्थापन झालेल्या या एजन्सीने संघीय संस्थांचे बजेट कमी करण्याचा दावा केला होता, परंतु टीकाकारांनुसार, DOGE ने नेमकी किती बचत केली, याचा कोणताही सविस्तर सार्वजनिक हिशेब दिला नाही, ज्यामुळे त्यांच्या दाव्यांची सत्यता पडताळणे अशक्य झाले.

इलॉन मस्क यांनी सुरुवातीला DOGE चे नेतृत्व केले होते आणि त्यांनी नोकरशाही संपवण्यासाठी ‘चिनसॉ’ (Chainsaw) घेऊन प्रचारही केला होता. मात्र, मस्क आणि ट्रम्प यांच्यातील वाद आणि मस्क यांच्या वॉशिंग्टनमधून बाहेर पडल्यानंतर DOGE फारकाळ टिकणार नाही असे संकेत मिळू लागले होते.

DOGE बंद झाले असले तरी, त्याचे माजी कर्मचारी प्रशासनात नवीन भूमिकांवर कार्यरत झाले आहेत. विशेषतः, एअरबीएनबीचे सह-संस्थापक आणि DOGE टीमचे सदस्य असलेले जो गेबिया आता ‘नॅशनल डिझाइन स्टुडिओ’चे प्रमुख बनले आहेत. तसेच, माजी DOGE प्रतिनिधी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर करून सरकारी नियमांमधून कपात करण्याच्या दिशेने काम करत आहेत.

व्हाईट हाऊसने मात्र, ट्रम्प प्रशासनाने सरकारी अपव्यय आणि फसवणूक कमी करण्याच्या आपल्या वचनबद्धतेवर सक्रियपणे काम करणे सुरूच ठेवल्याचे स्पष्ट केले आहे.