Russia Earthquake – 8.8 तीव्रतेच्या भूकंपानं पृथ्वी हादरली; रशिया-जपानमध्ये त्सुनामीच्या प्रलयकारी लाटा धडकल्या

रशियाच्या कामचटका बेटांजवळ 8.8 तीव्रतेचा प्रलयकारी भूकंप झाला आहे. पॅसिपिक समुद्रामध्ये भूकंपाचा केंद्रबिंदु आहे. भूकंपानंतर अमेरिका, जपान आणि रशियाला त्सुनामीचा इशारा देण्यात आला. रशिया आणि जपानच्या किनारी भागांमध्ये त्सुनामीच्या प्रचंड लाटांचा तडाखा बसण्यास सुरुवात झाली आहे.

हिंदुस्थानी वेळेनुसार बुधवारी पहाटे 4 वाजून 55 मिनिटांनी कामचटका बेटांजवळ शक्तीशाली भूकंप झाला. अमेरिकन भूगर्भ तज्ज्ञांनीही याची पुष्टी केली असून भूकंपानंतर जपान, रशिया आणि अमेरिकेतील किनारी राज्यांना त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. जपानमधील काही भागांमध्ये त्सुनामीच्या लाटा पोहोचल्याचे असून भूकंपामुळे रशियाच्या सुदूर पूर्वेकडील किनारी भागात मोठे नुकसान झाल्याचे वृत्त आहे.

जपानच्या स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, भूकंपाचा केंद्रबिंदु होक्काइडोपासून 250 किलोमीटर दूर होता. पॅसिपिक समुद्रामध्ये 19.3 किलोमीटर आत भूकंपाचा केंद्रबिंदु असल्याचे अमेरिकन भूगर्भ तज्ज्ञांनी सांगितले. या शक्तीशाली भूकंपामुळे धरती हादरून गेली. यामुळे नागरिकांनी रस्त्यावर धाव घेतली. अनेक घरांना, इमारतींना तडे गेल्याचे वृत्त असून यामुळे काही भागांचा वीजपुरवठाही खंडित झाला आहे. तसेच जपानच्या फुकुशिमा अणुउर्जी प्रकल्पही रिकामा करण्यात आला आहे.

भूकंपानंतर इक्वाडोर आणि रशियाच्या काही किनारी भागांत 3 मीटरहून अधिक उंचीच्या लाटा धडकल्याची शक्यता आहे. तसेच चिली, हवाई, जपान, सोलोमन बेट, अमेरिकेतील कॅलिफोर्निया आणि न्यूझीलंडमधील दक्षिणी भागांनाही त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. या भागांमध्ये 1 ते 3 मीटर उंचीच्या लाटा धडकण्याची शक्यता आहे.

त्सुनामीच्या इशाऱ्यानंतर वेगवेगळ्या देशातील सरकारांनी पावले उचलण्यास सुरुवात केली असून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. जपानच्या हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, होक्काइडोच्या पूर्वेकडील किनारी भागात आणि रशियाच्या कुरिल बेटांवर त्सुनामीच्या पहिल्या लाटा धडकल्या आहेत. या लाटांची तीव्रता कमी असल्याने कोणताही धोका नाही. या भागातील रहिवासी सुरक्षित असल्याची माहिती मिळते.