
देशातील राजकीय वातावरणावरून टीका होत असताना आता केंद्रातील सत्ताधारी NDA मध्ये पुनर्प्रवेश करणाऱ्या पक्षाच्या नेत्याचे विधान चर्चेत आले आहे. तमिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या काही महिने आधी राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरू झाली आहे. ‘अम्मा मक्कल मुन्नेत्र कझगम’ (AMMK) चे प्रमुख टीटीव्ही दिनकरन यांनी पुन्हा एकदा भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (NDA) सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. काही महिन्यांपूर्वीच अण्णा द्रमुकचे नेते आणि माजी मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी यांच्या कार्यशैलीवर नाराजी व्यक्त करत त्यांनी या आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता.
एनडीएमध्ये पुन्हा सहभागी झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना दिनकरन यांनी महत्त्वपूर्ण विधान केले. ते म्हणाले, ‘जे तडजोड करतात ते कधीच पराभूत होत नाहीत. ही एक नवीन सुरुवात आहे. तमिळनाडूमध्ये नवीन सरकार स्थापन करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. मला एकच सांगायचे आहे की, ज्यांनी त्याग केला आहे ते कधीही खाली गेले नाहीत. ‘अम्मा’ (जे. जयललिता) यांचे खरे अनुयायी म्हणून आम्ही सर्वजण एकत्र येऊ आणि राज्यात पुन्हा अम्मांचे शासन आणि सुशासन आणू.’
दिनकरन यांनी २०२४ ची लोकसभा निवडणूक एनडीएचा भाग म्हणून लढवली होती. मात्र, सप्टेंबर २०२५ मध्ये त्यांनी पलानीस्वामी यांच्या नेतृत्वावर आक्षेप घेत युती तोडली होती. त्यानंतर त्यांनी अभिनेता विजय याच्या ‘तमिळगा वेत्री कझगम’ (TVK) या पक्षाशी युती करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्या चर्चा यशस्वी झाल्या नाहीत. नुकतीच त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली, ज्यानंतर हे पुनरागमन निश्चित झाले.
शुक्रवारी चेन्नई येथे होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेला दिनकरन हे उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या सभेला ई. पलानीस्वामी, अंबुमणी रामदॉस (PMK) आणि जी. के. वासन (TMC) यांच्यासह इतर मित्रपक्षांचे नेतेही उपस्थित राहतील. दिनकरन यांच्या पुनरागमनामुळे दक्षिण तमिळनाडूतील मते एनडीएकडे वळवण्यास भाजपला किती मदत होऊ शकते हे येणारा काळच ठरवेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
TTV Dhinakaran rejoining NDA
AMMK chief TTV Dhinakaran rejoins the BJP-led NDA alliance ahead of the 2026 Tamil Nadu Assembly elections. After meeting Union Minister Piyush Goyal and Amit Shah, Dhinakaran emphasizes unity to bring back ‘Amma’s rule’ in the state.



























































