
नाशिकमधील कुंभमेळ्याच्या आखणीत आपत्ती व्यवस्थापन विभागाचा महत्त्वाचा वाटा आहे. याच विभागात अत्यंत कडक शिस्तीचे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्यात आली. दुसरीकडे कुंभमेळ्यासाठी कोटय़वधी रुपयांचा निधी मंजूर केला आहे आणि आर्थिक उलाढाल आहे. पण मुंढे यांच्या स्वच्छ कारभारामुळे मंत्रिमंडळातील एका बडय़ा मंत्र्यांसमोर ‘आपत्ती’ निर्माण झाल्याची चर्चा आहे. परिणामी मुंढेंना या विभागातून बाजूला करून ‘वेटिंग’वर ठेवले आहे, अशीही मंत्रालयात चर्चा आहे
सामान्य प्रशासन विभागाने 31 मार्च 2026 रोजी 10 ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले होते. त्यानुसार दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांची बदली मंत्रालयात आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन विभागाच्या सचिवपदी करण्यात आली होती. तर या विभागाच्या प्रधान सचिव विनिता वैद सिंगल यांना मृद आणि जलसंधारण विभागात पाठवण्यात आले होते. मात्र नव्या नियुक्तीच्या काळातच तुकाराम मुंढे यांच्या आईचे निधन झाल्याने त्यांना आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन विभागाच्या सचिव पदाची सूत्रे स्वीकरता आली नाहीत.
सडेतोड आणि पारदर्शक प्रशासकीय कार्यपद्धतीमुळे तुकाराम मुंढे यांची गेल्या 21 वर्षांच्या प्रशासकीय कारकिर्दीत 25 वेळा बदली झाली आहे. मुंढे यांच्यासारखे अधिकारी मंत्र्यांना नकोसे झाले आहेत. मुंढे यांची आपत्ती व्यवस्थापन विभागातील बदली रोखण्यामागे काही मंत्र्यांचा हात असल्याची चर्चा आहे. नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंढे यांची आपत्ती व्यवस्थापन विभागात नियुक्ती करण्यालाच मंत्रिमंडळातील दोन ज्येष्ठ नेत्यांचा विरोध होता असे सांगण्यात येते. आईच्या निधनामुळे रजेवर गेलेल्या मुंढे यांना आपत्ती व्यवस्थापन विभागाची सूत्रे स्वीकारली नाहीत त्याचाच फायदा घेत दोन मंत्र्यांनी मुंढे यांना खात्यातून बाजूला केल्याची चर्चा आहे.
सामान्य प्रशासन विभागाने विनिता वैद सिंगल यांच्या बदलीचे 31 मार्च 2026चे आदेश रद्द केले आहेत. सिंगल यांची नियुक्ती पुन्हा आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिवपदी करण्यात आली आहे.


























































