
>> तुषार प्रीती देशमुख
प्रसिद्ध कुकिंग शो ‘मास्टरशेफ’ च्या टॉप 36 मध्ये निवडला गेलेला मराठी चेहरा अशी ओळख असणारा सॅम म्हणजे संभाजी आटुगडे. नवी मुंबईतल्या कोपरखैराणे मधील संभाजीला आता ‘यूटय़ूबवाला सॅम’ या नावाने ओळखले जाते. लाखो फॉलोअर्स असलेले त्याचे यूटय़ूब चॅनेल त्याच्या मराठमोळ्या पदार्थांच्या रेसिपींसाठी खास प्रसिद्ध आहे.
घरातच जन्म घेतल्यामुळे डोळे उघडताच बहुधा त्याचं पहिलं लक्ष गेलं ते घरातल्या स्वयंपाकघराकडे. तिथूनच त्याला स्वयंपाकाची, पदार्थ तयार करण्याची आवड लागली असावी. आपले पारंपरिक पदार्थ एका उंचीवर नेऊन ठेवण्याचा त्याचा प्रवास अत्यंत खडतर, अगदी तो त्याच्या शैलीत म्हणतो तसा खतरनाक. या जिद्दी, होतकरू, कष्टाळू पठठय़ाचे नाव संभाजी बाळू आटुगडे. आपण ज्याला सगळेच ‘यूटय़ूबवाला सॅम’ या नावाने ओळखतो.
संभाजीचा जन्म नवी मुंबईमधील कोपरखैराणे येथील एका सामान्य कुटुंबातला. त्याचे वडील बाळू आटुगडे हे माथाडी कामगार. एकदा संभाजीची आई आजारी होती. बहीण व भाऊ नोकरी करत असल्यामुळे स्वयंपाकघरातली जबाबदारी त्यांनी स्वीकारली तेव्हा पहिल्यांदा त्याने कांदेपोहे करायचे ठरवले. तेव्हापासून त्याला पदार्थांमध्ये असलेल्या जिन्नसांची ओळख पटू लागली. लहानपणापासूनच आई स्वयंपाक करताना संभाजीमध्ये लुडबुड करायचा व त्या पदार्थात काय घातले आहे हे समजूनदेखील घ्यायचा. वडीलदेखील उत्कृष्ट स्वयंपाक करायचे.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी करण्याला संभाजीचा विरोध होता. त्याने कुटुंबीयांसमोर स्पष्टपणे सांगितले की त्याला नोकरी न करता स्वतचे खाद्यपदार्थ सादरीकरणाचे यूटय़ूब चॅनेल सुरू करायचे आहे. याला सगळ्यांनी विरोध केला मात्र तो त्याच्या मतावर ठाम होता. शेवटी त्याच्या वडिलांनी त्याला एक वर्ष संधी देण्याचे ठरवले. मात्र महिन्याला ठरावीक रक्कम संभाजीकडून घरी आलीच पाहिजे हा दंडक होताच. त्याप्रमाणे संभाजीने 2019 साली स्वतचे YouTube Wala Sam या नावाने यूटय़ूब चॅनेल चालू केले.
सुरुवातीला महिन्यातून एक व्हिडीओ तो अपलोड करू लागला. तो शूट केला त्याची मैत्रीण चारू हिने. सुरुवात होत नाही तोच लॉकडाऊन लागले पण तो खचला नाही. या संकटाच्या काळातदेखील त्याने स्वतचे व्हिडीओ बनवले. सोबत इतरांसाठी व्हिडीओ एडिटिंग, थंबनेल, क्रिप्टचे लेखन, पदार्थांच्या लिखाणाची कामे, तसेच रेसिपी यूटय़ूब चालवणाऱयांचे बॅक किचन सांभाळणे ही कामे करत पैसे कमावले. 2019 ते 2022 हा काळ त्याच्यासाठी संघर्षाचा होता. या काळात त्याला चारू, निखिल, चिन्मय, ज्योती या मित्रांनी सहकार्य तर केलेच, पण मानसिक आधारही दिला. या चार वर्षांत त्याला त्याच्या चॅनेलमधून शून्य आर्थिक मोबदला मिळायचा, पण इतरांची कामे स्वीकारून त्याने आर्थिक बाजूदेखील सक्षम ठेवली होती.
2023 हे साल संभाजीने केलेल्या संघर्षाचे सकारात्मक फलित देणारे ठरले. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला ‘मास्टर शेफ’ या कार्यक्रमाची माहिती मिळाली. या कार्यक्रमाच्या ऑडिशनच्या पहिल्या फेरीत महाराष्ट्रीयन पद्धतीच्या झुणका भाकरीचे (ज्वारीची भाकरी आणि तुपातला ठेचा) उत्तम सादरीकरण करून परीक्षकांचे मन जिंकले व दुसऱया फेरीसाठी निवडला गेला. त्यानंतरच्या फेरीमध्ये त्याने इटालियन डेझर्टमध्ये पुरणपोळी व कटाच्या आमटीचा सॉस म्हणून वापर केला. हा पदार्थ सर्व परीक्षकांच्या पसंतीस उतरला व तो टॉप 36 मध्ये निवडला गेला. संभाजी मोठय़ा टेलिव्हिजनच्या पडद्यावर झळकू लागला.
जसा प्रत्येकाच्या आयुष्यात एक टर्निंग पॉइंट येतो तसाच ‘मास्टर शेफ’ हा संभाजीच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा. त्यानंतर मात्र त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. त्याच्या चॅनेलचे फॉलोअर्स वाढले. त्याचा फोडणीच्या भाताचा व मातीच्या भांडय़ांचा व्हिडीओ प्रचंड गाजला. संभाजी बाळू आटुगडे आता ‘सॅम’ म्हणून जगप्रसिद्ध झाला होता. ज्यांनी ज्यांनी त्याला नाकारले होते ते सर्व त्याची स्तुती करायला लागले. त्याच्या आईवडिलांनी त्यांच्या गावी सांगलीमधील सर्वांना आपला मुलगा टीव्हीवर दिसतोय म्हणून आनंदाने सांगितले. भाजीवाल्या दादांपासून ते मॉलमधील दुकानदारांपर्यंत सर्वच जण सॅमला ओळखू लागले होते.
संभाजी त्याच्या चॅनेलवर जे पदार्थ दाखवतो ते अगदी सोपे, घरगुती व सहज घरी बनवता येतील असे असतात. ते पदार्थ सांगण्याची त्याची पद्धत अत्यंत सोपी व आपल्याला तो पदार्थ बनवण्यासाठी प्रेरित करणारी असते. प्रत्येक पदार्थाचे सादरीकरण हे उत्तम असले पाहिजे यावर त्याचा नेहमीच भर असतो. त्याचा आपलंसं करणारा मधुर आवाज हीच खरी त्याच्या पदार्थ समजावण्याची ताकद आहे. लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांची मनं त्याने जिंकली आहेत. सॅमचे भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगभरात फॉलोवर्स आहेत. “अहो मंडळी’’, “आरारा…रा…रा… खतरनाक’’ हे दोन त्याचे पेटंट डायलॉग, ज्यांनी सगळ्यांचीच मने जिंकली. या दोन डायलॉगवर अनेकांनी रीलदेखील बनवले. सॅम आज यशाच्या, प्रसिद्धीच्या शिखरावर असला तरी तो आपल्याला आपलंसं करणारा आपल्यातला सॅम आहे.
पदार्थ सादरीकरणाच्या क्षेत्रात अनेक महिला व पुरुष आहेत, पण त्यात स्वतची ओळख निर्माण करून घराघरांत पोहोचलेला तरुण, ज्याने आपल्या महाराष्ट्रातील खाद्य संस्कृतीला त्याच्या बोलण्याच्या व सादरीकरणाच्या कलेतून जगभरात पोहोचवले. सॅमची आई लक्ष्मी आटुगडे या त्याच्या यूटय़ूब चॅनेलचे संपूर्ण बॅक किचन सांभळतात. आपल्या मुलाला मिळालेले हे यश पाहून त्याचे कुटुंबीय अत्यंत अभिमानाने त्याचे कौतुक करतात. आयुष्य जगताना सकारात्मक राहून यशाचे शिखर गाठता येते हे संभाजी बाळू आटुगडेने सिद्ध करून दाखवले आहे. तो म्हणतो आपले पॅशन कधीही वाया जाऊt देऊ नका. कारण तुम्हाला जे काम आवडते ते क्षेत्र निवडल्यावर त्यातच तुम्हाला यशस्वी होता येतं. फक्त त्यासाठी लागते ती जिद्द, सकारात्मक ऊर्जा व संयम.
[email protected]
(लेखक युटय़ूब शेफ आहेत.)