‘कुमकुम भाग्य’ फेम आशा शर्मा यांचे निधन, वयाच्या 88 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

टीव्हीवरील लोकप्रिय शो ‘कुमकुम भाग्य’ च्या ज्येष्ठ अभिनेत्री आशा शर्मा यांचे निधन झाले आहे. वयाच्या 88 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मात्र आशा यांच्या निधनाचे कारण अद्याप समोर आलेले नाही. सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनने अभिनेत्रीच्या निधनाची एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. आशा शर्मा यांच्या निधनामुळे टीव्ही आणि सिनेइंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे.

आशा शर्मा गेल्या 4 दशकांपासून टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्रीचा एक भाग होत्या. त्यांनी अनेक टीव्ही सिरीअलमध्ये आई आणि आजीची भूमिका साकारली होती. ‘दो दिशां’, ‘मुझे कुछ कहना है’, ‘प्यार तो होना ही था’ आणि ‘हम तुम्हारे हैं सनम’ या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं होतं. 1982 मध्ये हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या ‘दो दिशाएं’ या चित्रपटात आशाने श्रीमती निवारण शर्मा यांची भूमिका साकारली होती. आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केले होते. अभिनेता प्रभास आणि क्रिती सेननच्या ‘आदिपुरुष’ या चित्रपटात दिसल्या होत्या. आशा यांनी आपल्या 4 दशकांच्या कारकिर्दीत सुमारे 40 चित्रपट आणि अनेक टीव्ही शो केले.

गेल्या 5 महिनांपासून आजारी होत्या- टीना घई

‘गेल्या वर्षी आदिपुरुष चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आशा 4 वेळा घसरून पडल्या होत्या. एप्रिल महिन्यांपासून त्या पूर्णपणे अंथरुणाला खिळून होत्या. आशा शर्मा यांना शेवटच्या श्वासापर्यंत काम करायचे होते. गेले पाच महिने जाग्यावर असूनही त्यांच्यामध्ये काम करण्याचा उत्साह होता’, असे अभिनेत्री टीना घईने यांनी सांगितले. आशा शर्मा यांच्या निधनांमुळे संपूर्ण टीव्ही इडस्ट्रीला धक्का बसला आहे. दरम्यान सगळ्या कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.