प्रेमसंबंधास विरोध केल्याच्या रागातून टीव्ही मालिकेतील अभिनेत्रीने प्रियकराच्या पुतण्याचे अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. सबरीन शेख असे अभिनेत्रीचे नाव असून क्राईम पेट्रोल या मालिकेत तिने पोलिसाची भूमिका केली आहे. सबरीन हिचे बृजेश गौतम या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. मात्र बृजेशचा भाऊ दिनेश व वहिनी प्रीती हिने त्यांच्या प्रेमसंबंधाला विरोध केल्याच्या रागातून सबरीनने त्यांचा तीन वर्षीय मुलगा प्रिन्स याचे अपहरण केले. ही माहिती मिळताच वालीव पोलिसांनी अवघ्या चार तासांत सबरीनला अटक करून प्रिन्सची सुखरूप सुटका केली.
दिनेश व प्रीती या दोघांनी बृजेश आणि सबरीनच्या प्रेमसंबंधास विरोध केला. त्यामुळे बृजेश सबरीनपासून दुरावला होता. त्यामुळे संतापलेल्या सबरीनने त्या दोघांना धडा शिकवण्यासाठी चिमुकल्याच्या अपहरणाचा कट रचला. प्रिन्स शाळेत गेला असताना तिने शाळेत जाऊन प्रिन्सला औषध द्यायचे आहे आणि त्याला आईने घरी बोलावले अशी थाप मारली आणि प्रिन्सला घेऊन फरार झाली. मात्र ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी वालीव पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला.
प्रिन्सला नातेवाईकाकडे ठेवले
पोलिसांनी शाळेच्या परिसरातील सीसीटीव्ही तपासले. त्यावेळी सबरीन ही प्रिन्सला घेऊन जाताना दिसली. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने तिचा मागोवा घेत वांद्रे येथून तिला ताब्यात घेतले. तिची चौकशी केली असता तिने प्रिन्सचे अपहरण करून नायगाव येथील एका नातेवाईकाकडे ठेवल्याची कबुली दिली.