नेपाळमधील निदर्शनाला हिंसक वळण, 20 जणांचा मृत्यू; गृहमंत्री रमेश लेखक यांनी दिला राजीनामा

नेपाळमधील भ्रष्टाचार आणि सोशल मीडिया बंदीविरोधातील तीव्र निदर्शनांदरम्यान झालेल्या हिंसक झटापटीत २० जणांचा मृत्यू झाला असून ३४७ हून अधिक जण जखमी झाले आहेत. या हिंसाचाराची नैतिक जबाबदारी स्वीकारत गृहमंत्री रमेश लेखक यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

नेपाळ सरकारने ४ सप्टेंबर रोजी फेसबुक, यूट्यूब, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप आणि एक्ससह २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातली होती. सरकारने या प्लॅटफॉर्म्सनी देशात नोंदणी न केल्याने आणि करचुकवेगिरी, सायबर सुरक्षा आणि कंटेंट मॉडरेशनच्या कारणास्तव हा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. मात्र या बंदीमुळे तरुणांमध्ये तीव्र संताप पसरला, कारण त्यांना हा निर्णय अभिव्यक्ती स्वातंत्र्य दडपण्याचा प्रयत्न वाटला. परिणामी, हजारो तरुणांनी काठमांडूमधील संसद भवन परिसरात निदर्शने केली.

निदर्शने सुरू झाल्यानंतर निदर्शनकर्त्यांनी संसद भवनाच्या परिसरात प्रवेश केला. यावेळी काहींनी भिंतींवर चढून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. याला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी अश्रुधूर, वॉटर कॅनन, लाठीमार आणि रबर बुलेट्सचा वापर केला. यात २० जणांचा मृत्यू झाला, तर ३४७ हून अधिक जण जखमी झाले.