
अहिल्यानगर शहरातील नामांकित सहा डॉक्टरांविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात कटकारस्थान करणे, खोटे कागदपत्र तयार करणे, चुकीच्या उपचाराने मृत्यूस कारण बनणे, फसवणूक करणे, पुरावा नष्ट करणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आरोपी दोन डॉक्टरांनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यांचा अंतरिम जामीन फेटाळण्यात आला होता. आज या अर्जावर पुन्हा सुनावणी झाली असता, दोन्ही डॉक्टरांनी आपला जामीन अर्ज मागे घेतला आहे.
या गंभीर तक्रारीनंतर तोफखाना पोलीस ठाण्यात डॉ. गोपाळ बहुरुपी, डॉ. सुधीर बोरकर (रा. अहिल्यानगर), डॉ. मुकुंद तांदळे (रा. सावेडी, अहिल्यानगर), डॉ. अक्षयदीप झावरे-पाटील (रा. अहिल्यानगर), डॉ. सचिन पांडुळे (रा. अहिल्यानगर) तसेच डॉ. विखे-पाटील मेमोरिअल हॉस्पिटल, विळद घाट, अहिल्यानगर येथील पॅथॉलॉजिकल लॅबचे तज्ञ डॉक्टर आणि इतर अज्ञात कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहिल्यानगरातील आरोग्य क्षेत्रात खळबळ उडवून देणाऱ्या या प्रकरणात फिर्यादी अशोक बबनराव खोकराळे (वय 47, रा. पाईपलाईन रोड, सावेडी, अहिल्यानगर) यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत धक्कादायक आरोप केले आहेत. संबंधित डॉक्टरांनी कोरोनाचा खोटा अहवाल तयार करून अवयवदानाच्या नावाखाली अवयवांची तस्करी केल्याचा संशय असून, चुकीच्या पद्धतीने उपचार देऊन रुग्णाचा मृत्यू झाला. त्यानंतर पुरावे नष्ट करून या संपूर्ण प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न झाला, असे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेल्या डॉ. गोपाळ बहुरुपी (रा. न्युक्लिअस हॉस्पिटल, अहिल्यानगर) आणि डॉ. सुधीर बोरकर यांनी मंगळवारी (दि. 21) न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, न्यायाधीश एम. एच. शेख यांनी त्यांचा अंतरिम जामीन फेटाळला होता. आज पुन्हा सुनावणीदरम्यान दोन्ही डॉक्टरांनी स्वतःच आपले जामीन अर्ज मागे घेतले आहेत.
या प्रकरणातील गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने पोलिसांकडून तपास अधिक गतीने सुरू करण्यात आला आहे. संबंधित हॉस्पिटल्स व लॅबची नोंद, रुग्णांचे उपचार रेकॉर्ड आणि अवयवदानाशी संबंधित सर्व कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे. पोलिसांकडून या प्रकरणाशी संबंधित इतर व्यक्तींचीही चौकशी केली जात आहे. दरम्यान, या घडामोडीमुळे शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.


























































