
रोहा कुंडलिका नदी पात्रात पोहायला गेलेल्या पाच मुलांपैकी दोन जण पाण्यात बुडाले. साई मॅनेजमेंट कॅटरींग सर्व्हिस पुणे यांच्या माध्यमातून रोह्यातील ओसवाल भवनमध्ये लग्नसमारंभ निमित्त ऑर्डरसाठी ही मुले आली होती. रोहित कांबळे वय, निशांत शेटे, हनुमंत इंगळे, फैयाज अख्तर व आदेश महादेव सकपाळ अशी या मुलांची नावे आहेत. यापैकी फैयाज अख्तर वय 20 वर्ष व आदेश महादेव सकपाळ 19 वर्ष या दोघांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.
कामासाठी आलेली ही मुले दुपारचे काम आटोपल्यावर जवळच असलेल्या कुंडलिका नदीवर आंघोळीला गेले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने यापैकी फयाज अख्तर, आदेश सकपाळ यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. सदरची बातमी जवळच असलेल्या रोहा पोलिस ठाण्यात समजली असता पोलीस हवालदार सुनिल पाटिल यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली व या मुलांना वाचविण्यासाठी पाण्यात उडी मारली. मात्र त्यांच्या हाती प्रथम एक मृतदेह सापडला. इतक्यात दुसर्याचा शोध घेत असताना पाण्यात बुडून इसमाला बाहेर काढले. त्याला उपजिल्हा रुग्णालय रोहा येथे उपचारासाठी नेले असता त्याचाही मृत्यू झाला आहे. सुदैवाने बाकीच्या तिघांना वाचविण्यात यश आले.























































