
गेल्या महिन्यात धारावीत एका सामूहिक बलात्कार प्रकरणात धारावी पोलिसांनी अटक केलेल्या अनिल चौहान (19) आणि नीलेश चौहान (20) या दोन भावांची वांद्रे मॅजिस्ट्रेट कोर्टाने शुक्रवारी निर्दोष मुक्तता केली. कोर्टात हजर असलेल्या पीडित मुलीने सांगितले की, 11 मे रोजी तिच्यावर बलात्कार करणारे हे दोघे भाऊ नव्हते.
एका पोलिस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार जेव्हा न्यायालयाने पीडितेला विचारले की तिला दोघांच्या सुटकेवर काही आक्षेप आहे का, तेव्हा तिने आक्षेप नाही असे उत्तर दिले. या प्रकरणात दोघा भावांना चुकीच्या पद्धतीने अटक करण्यात आल्याची तक्रार सहपोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील यांच्याकडे करण्यात आली होती.
दोघे भाऊ धारावीत एका नातेवाईकाच्या लग्नासाठी आले होते. यावेळी त्यांनी मुलीचा पाठलाग केल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर ते तिच्या घरात घुसले. व चाकूच्या सहाय्याने लहान भावाने मुलीवर लैंगिक अत्याचार केला, तर मोठ्याने व्हिडिओ बनवला. गुन्हा केल्यानंतर त्यांनी तिला धमकावून पळ काढला. असा आरोप या भावांवर करण्यात आला होता.
मात्र प्राथमिक चौकशीत ते घटना घडण्याच्या वेळेस विलेपार्ले येथे असल्याचे आढळून आले, ते गुन्ह्याच्या ठिकाणापासून सुमारे 8 किमी अंतरावर होते. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही भावांना सीआरपीसी कलम 169 अन्वये दोषमुक्त करण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला, कारण त्यांच्याविरुद्ध कोणताही सक्षम पुरावा आढळला नाही.

























































