
औसा तालुक्यातील आलमला येथे बुधवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास शेतातील विहिरीमध्ये दोर लावून मोटार पाण्यात सोडत असताना पाण्यामध्ये बुडून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला. शरण गुरुनाथ बिराजदार (वय – 26) व राहुल गुरुनाथ बिराजदार (वय – 36) अशी दोघा भावांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, आलमला येथील शेतकरी गुरुनाथ बिराजदार यांची शरण आणि राहुल नावाची मुले शेतामधील विहिरीत दोराच्या सहाय्याने मोटार सोडायला गेले होते. विहिरीला भरपूर पाणी असल्या कारणाने एका भावाचा तोल गेल्याने तो विहिरित पडला. त्याला वाचवण्यासाठी दुसऱ्या भावाने देखील विहिरीत उडी घेतली. मात्र यात दोन्ही सख्ख्या भावांचा मृत्यू झाला आहे.
घडलेला प्रकार लक्षात येताच दोघांनाही तातडीने लातूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यूमुळे गावावर शोककळा पसरली आहे. या प्रकरणी औसा पोलिसात आकस्मिक मृत्युचा गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास औसा पोलीस हे करीत आहेत.


























































