धाराशिवमध्ये विहीरीचा कडा कोसळल्याने दोन मुलांचा करुण अंत

485

वाशी तालुक्यातील बनगरवाडी येथे दोन विद्यार्थ्यांना विहिरीच्या कडेवर बसणे जीवावर बेतले आहे. विहिरीची दरड कोसळून त्याखाली पाण्यात दबून दोघांचाही मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी आठच्या सुमारास घडली.

वाशी तालुक्यातील बनगरवाडीच्या शिवारामध्ये असलेल्या एका विहिरीवर गावातील आठ मुले सकाळी पोहण्यासाठी गेली होती. यापैकी सहाजण विहिरीमध्ये पोहत होती तर विवेक आश्रू लांडगे (13) व करण शहाजी बोडके (13) ही इयत्ता सातवीत शिकणारे दोघे विहिरीच्या वरच्या बाजूला बसून पोहत असलेल्या अन्य सहा जणांना पाहत होते. परंतु, याच वेळी हे दोघे बसलेल्या बाजूकडूनच जुन्या पद्धतीने दगड, मातीने बांधलेली विहिरीची दरड पाण्यामध्ये कोसळली. पूर्ण दरड पाण्यामध्ये पडली. त्यामुळे याच ठिकाणी बसलेले करण व विवेक पाण्यामध्ये पडलेल्या दरडेच्या ढिगार्‍याखाली दबल्याने जागीच त्यांचा मृत्यू झाला. यावेळी पाण्यामध्ये पोहत असलेल्या बाकीच्या सहा मुलांचे नशीब बलवत्तर म्हणून ते विहिरीत असून देखील वरून कोसळणार्‍या दरडेच्या दगड त्यांचे अंगावर पडले नाहीत. ते दुसऱया बाजूला झाल्याने त्यांचा जीव वाचला.

घटनेची माहिती गावामध्ये कळताच गावकर्‍यांची मोठी गर्दी झाली होती. घटनास्थळी दाखल झालेल्या तहसीलदार डॉ. संदीप राजपुरे व पोलीस निरीक्षक उस्मान शेख व इतर कर्मचाऱयांनी गावकर्‍यांच्या मदतीने विद्युत मोटारी चालू करत विहिरीतील पाणी बाहेर काढून दोन्हीं मुलांचे मृतदेह बाहेर काढले. घडलेल्या घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या