तटरक्षकदलाच्या दोन कर्मचाऱ्यांकडून 50 लाख रुपयांचे कोकेन पकडले

32

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

मिरजोळे एमआयडीसी परिसरात पोलिसांनी सापळा रचून 50 लाख रूपये किमंतीचे 936 ग्रॅम कोकेन जप्त केले आहे. या कारवाईत पोलिसांनी तिघांना अटक केली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. तीन आरोपींमध्ये दोन तटरक्षकदलाचे कर्मचारी असल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात अंमली पदार्थांची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याची ख़बर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे मिळताच पोलिसांनी शनिवारी सायंकाळी साडे सहा वाजल्यापासून एमआयडीसी मिरजोळे परिसरात सापळा रचला. त्यावेळी हर्षा फ़ूड्सकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पडक्या इमारतीत तिघेजण आपासात बोलत असल्याचे आढळले. पोलिसांनी त्या तिघांची झडती घेतली असता त्यांना प्लास्टिकच्या पिशवीत पांढऱ्या रंगाची पावडर दिसून आली. मोबाईल फॉरेन्सिक पथकाने तपासणी करताच ते कोकेन असल्याचे स्पष्ट झाले. त्याची अंदाजे किंमत 50 लाख रुपये असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी दिली.

कोकेन प्रकरणी दिनेश शुभे सिंह वय 23 रा. हरियाणा, सुनीलकुमार नरेंद्रकुमार रणवा वय 26 रा. राजस्थान, रामचंद्र तुलीचंद मलीक, वय 51 रा.गन्नोर जिल्हा सोनपत हरियाणा या तिघांना पोलिसांनी अटक केली. त्यांना रविवारी दुपारी न्यायालयात हजर केले असता त्यांना 29 जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.प्रविण मुंढे,अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे,पोलीस निरीक्षक शिरीष सासने, पोलीस निरीक्षक सुरेश कदम आणि पोलीस पथकाने केली.

आपली प्रतिक्रिया द्या