मुंबईत प्लाझ्मा थेरपीने दोन रुग्ण कोरोनामुक्त; महापालिकेच्या प्रयत्नांना यश

675
corona-test-11

मुंबईत महापालिकेने कोरोना उपचारासाठी सुरू केलेल्या महत्त्वाकांक्षी ‘प्लाझ्मा थेरपी’ला मोठे यश आले असून नायर रुग्णालयात दोन रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. या रुग्णांना लवकरच डिस्चार्ज देण्यात येणार असून आणखी काही कोरोना रुग्णांवर या पद्धतीने उपचार करण्यात येतील, अशी माहिती नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी दिली. इंडियन कौन्सिल ऑफ रीसर्चच्या गाइडलाइननुसार ही उपचारपद्धती वापरली जात असल्याचे ते म्हणाले.

कोरोनामुक्त झालेल्या रुग्णाच्या शरीरातून अँटीबॉडीज मिळवून त्यांचा उपयोग कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी वापरणे अशी ही प्लाझ्मा थेरपी आहे. चीनसह काही देशांत ही थेरपी यशस्वीही झाली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेनेही मुंबईत कोरोनाबाधितांवर प्लाझ्मा थेरपी वापरण्यास सुरुवात केली आहे. यासाठी महापालिकेचे मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालय ‘प्लाझ्मा थेरपी केंद्र’ सुरू करण्यात आले आहे. पालिकेने कोरोनामुक्त झालेल्या दात्यांकडून प्रतिपिंडे मिळवली होती. यांचा वापर दोन कोरोनाबाधितांवर उपचारासाठी गेल्याच आठवड्यात सुरू करण्यात आला होता. या रुग्णांच्या प्रकृतीत चांगली सुधारणा झाली असून ते कोरोनामुक्त झाले आहेत.

लवकरच आणखी अँटीबॉडिज मिळवणार
प्लाझ्मा थेरपीसाठी कोरोनामुक्त रुग्णाकडून प्रतिपिंडे मिळवावी लागतात. यासाठी इंडियन कौन्सिल ऑफि मेडिकल रीसर्चच्या गाइडलाइननुसार कोरोनामुक्त झाल्यानंतर ठराविक दिवस जावे लागतात. शिवाय त्या रुग्णाची प्रकृतीही चांगली असावी लागते. तसेच प्रतिपिंडे मिळवण्यासाठी कोरोनामुक्त रुग्णाची परवानगी, इच्छा असावी लागते. या पार्श्वभूमीवर आलेले यश पाहता लवकरच कोरोनामुक्त रुग्णांकडून आणखी प्रतिपिंडे मिळवण्यात येणार आहेत. दरम्यान, मुंबईत लीलावती रुग्णालयात करण्यात आलेल्या पहिल्या प्लाझ्मा थेरपीत संबंधित 52 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला होता. मात्र, आता दोन रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने पालिकेच्या आशा उंचावल्या आहेत. त्यामुळे या प्लाझ्मा थेरपीचा वापर वाढवण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या