
आजरा तालुक्यात दोन विभागात स्वतंत्रपणे वावरणारे दोन्ही हत्ती मंगळवारी एकत्र आले. धनगरमोळा-सुळेरान आणि मसोली-हाळोली-वेळवट्टी भागातील दोन्ही हत्ती मंगळवारी सकाळी 7.45 सुमारास ग्रामस्थांना एकत्र दिसले. हे दोन्ही नर हत्ती आहेत. दोन्ही हत्ती एकत्र आल्यामुळे तालुक्याच्या पश्चिम भागातील त्यांचा उच्छाद वाढण्याची शक्यता आहे. तसेच शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीत भर पडणार आहे. तालुक्यातील हाळोलीबरोबर आता माद्याळ परिसरातही हत्तींचा धुमाकूळ सुरू असून त्यांनी रात्री मोठ्या प्रमाणात पीकांचे नुकसान केले आहे.
तालुक्यात एक हत्ती गेल्या वर्षीपासून हाळोली, वेळवट्टी आणि मसोली दरम्यानच्या चाळोबा जंगलात ठाण मारून बसला आहे. तर 20 दिवसांपूर्वी चंदगडमधून दुसरा हत्ती धनगरमोळा परिसरात बुजवडेमार्गे आला आहे. या दोघांकडून पीकांचे नुकसान करण्यात येत होते. ऊस, रोपलावणीचे भात, नाचणी, बांबू, नारळ आदींसह शेतातील पाण्याच्या टाक्या, पाईपलाईनसह अवजारांचे नुकसान हत्ती करत होते. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आले होते. मंगळवारी सकाळी दोन्ही हत्ती हाळोली परिसरात एकत्र दिसून आले. येथील कांबळे कुटुंबियांच्या नारळशेत परिसरात ग्रामस्थांना सकाळी दोघे एकत्र दिसले. त्यांच्या एकत्र येण्याने त्यांचा उच्छाद वाढण्याची शक्यता आहे.
दोन हत्ती एकत्र आल्याची माहिती मिळताच वनपाल कृष्णा डेळेकर व इतरांनी लागलीच हाळोली परिसराकडे धाव घेतली. हे दोन्ही नर हत्ती असल्याने ते किती काळ एकत्र राहतील याबाबत शंका असली तरी सोमवार रात्रीपासून ते एकत्र आहेत. माद्याळ गाव परिसरात दोन्ही हत्तींनी मिळून ऊस, भात, नारळ आणि मेसकाठीचे मोठे नुकसान केले आहे. ग्रामस्थ व वनविभाग कर्मचाऱ्यांनी हत्तींच्या मागावर राहून सुरबाण सोडत हत्तींना चाळोबाच्या जंगलाकडे हुसकावून लावले आहे.


























































