संडासात आधी कोण जाणार? क्षुल्लक कारणावरून भर विमानातच दोन कर्मचाऱ्यांमध्ये जुंपली

टॉयलेटमध्ये आधी कुणी जायचं या क्षुल्लक कारणासाठी हजारो फूट उंचीवर दोघा जणांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याचं वृत्त आहे. गंभीर म्हणजे हे दोघेही त्याच विमान कंपनीचे कर्मचारी आहेत.

ही घटना चीनमधील पेइचिंग येथे घडली आहे. डोंघई नावाच्या एअरलाईन्सचं हे विमान लँडिंग होणार होतं. त्यापूर्वी 50 मिनिटं आधी ही घटना घडली. या घटनेत विमानाचा पायलट आणि एक फ्लाईट अटेंडंट यांचा समावेश आहे.

काय घडलं नेमकं?

त्याचं झालं असं की विमानाचा आकाशातील प्रवास सुरू असताना त्याचा एक वैमानिक लघुशंकेसाठी टॉयलेटमध्ये जायच्या बेतात होता. पण, त्याच वेळी प्रथम दर्जाच्या केबिनमधील एक प्रवासी तिथे आला. त्यालाही टॉयलेटचा वापर करायचा होता. मात्र, वैमानिकाने त्या प्रवाशाची मागणी धुडकावून लावली. त्याला तिथेच थांबायची सूचना करून तो आधी टॉयलेटमध्ये शिरला.

टॉयलेट वापरून झाल्यानंतर जेव्हा वैमानिक बाहेर आला तेव्हा त्याला दिसलं की तो प्रवासी पुन्हा आपल्या जागेवर बसायचं सोडून टॉयलेटच्या दारातच उभा आहे. ते पाहून वैमानिकाचा पारा चढला. त्याने ताबडतोब तिथे कर्तव्यावर हजर असलेल्या फ्लाईट अटेंडंटला बोलावून त्याला झापायला सुरुवात केली.

आधी बाचाबाची मग तुंबळ हाणामारी 

वैमानिकाच्या आरोपांनुसार फ्लाईट अटेंडंटने त्याचं काम नीट केलं नव्हतं. प्रवाशांची सोय नीट न पाहिल्यामुळे विमानाची सुरक्षा धोक्यात आल्याचे आरोप त्याने केले. हे आरोप अटेंडंटने धुडकावून लावले. त्यावर आधी त्यांची शाब्दिक बाचाबाची सुरू झाली आणि काही वेळात या बाचाबाचीचं पर्यवसान हाणामारीत झालं.

ही हाणामारी इतकी जबरदस्त होती की फ्लाईट अटेंडंटचा हात फ्रॅक्चर झाला आणि या वैमानिकाचे दात तुटले. या घटनेचा व्हिडीओही व्हायरल झाला. त्यानंतर या विमान कंपनीने दोन्ही कर्मचाऱ्यांना निलंबित केलं असून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या