काश्मीरमध्ये दोन जवान शहीद, तीन जखमी; सुरक्षा दलांचे सर्च ऑपरेशन सुरू

जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात शनिवारी दुपारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद झाले आहेत. तर अन्य तीन जवान जखमी झाले. जखमींना जवानांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनग परिसरातील घनदाट जंगलात सुरक्षा दलाकडून सर्च ऑपरेशन सुरु आहे.

कोकरनाग येथील जंगलात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी जवानांनी जंगलात सर्च ऑपरेशन सुरु केले. यादरम्यान दुपारच्या सुमारास सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात चकमक झाली. यात आधी दोन जवान जखमी झाल्याचे समोर आले. यानंतर सायंकाळी जखमींची संख्या तीन झाली असून दोन जवानांना वीरमरण आल्याचे लष्कराच्या सूत्रांकडून कळते.

मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण काश्मीरमध्ये अनंत जिल्ह्यातील कोकरनागच्या गागरमांडू वनक्षेत्रात ही चकमक सुरु आहे. सर्व दहशतवादी जैश-ए-मोहम्मदचे सदस्य असून डोडा जिल्ह्यातून त्यांनी दक्षिण काश्मीरमध्ये प्रवेश केल्याची माहिती मिळते.