हर्सूलच्या तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू

36

सामना प्रतिनिधी, संभाजीनगर

वाळूमाफियांनी वाळू धुण्यासाठी तयार केलेल्या खड्डय़ात साचलेल्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मावस भावंडांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी हर्सूल परिसरात घडली. खड्डय़ातील गाळात अडकल्याने दोन्ही मुलांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मृतांपैकी एक मुलगा सहावीत शिकत होता, तर दुसरा अरबी शाळेत शिकत होता. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

हर्सूल परिसरातील यासीननगरात राहणारा सोहेल शफिक पठाण (११) हा फातेमानगरातील शाळेत सहावीत होता. त्याचा मावसभाऊ शेख युसूफ शेख युनूस (१३) हा मदरशात होता. सोमवारी दुपारी सोहेल शाळेतून घरी आल्यावर तो युसूफला घेऊन अरबी मदरशाजवळ वाळूमाफियांनी खोदलेल्या खड्डय़ात पोहायला गेला. खड्डय़ात ९ फूट खोल पाणी साचलेले आहे. या पाण्यात हे दोघे पोहण्यासाठी उतरले आणि गाळात अडकले. मुले बुडाल्याचे कळताच परिसरातील लोकांनी तलावात उतरून दोघांना बेशुद्धावस्थेत बाहेर काढून घाटी रुग्णालयाने नेले. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. मृत शेख युसूफचे वडील रिक्षाचालक असून, त्यांना पाच मुले व दोन मुली आहेत. सोहेलचे वडील शफीक पठाण हे पटेल फार्महाऊस येथे वॉचमन असून, त्यांना चार मुले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या