तुळजापूरला तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन गावाकडे परत येत असताना शिरोळमधील भाविकांवर काळाने घाला घातला. भाविकांच्या मोटारीने मालट्रकला पाठीमागून धडक दिली. या अपघातात दोघेजण जागीच ठार; तर तिघेजण गंभीर जखमी झाले. हा अपघात आज पहाटे सोलापूर-सांगली महामार्गावरील चिंचोली बायपास (ता. सांगोला) येथे घडला. अपघातातील मृत व जखमी कोल्हापूर जिह्यातील आहेत.
सुखदेव बामणे (वय 40) व नैनेश कोरे (वय 31, दोघेही रा. नांदणी, ता. शिरोळ जि. कोल्हापूर) अशी मृतांची नावे आहेत. तर अनिल शिवानंद कोरे (वय 42, रा. नांदणी, ता. शिरोळ), सुधीर चौगुले (वय 35, रा. वडगाव, ता. हातकणंगले), सूरज विभुते (वय 21, रा. कोथळी, ता. शिरोळ) हे तिघेजण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर सांगोल्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर महामार्ग पोलीस पथक व सांगोल्याचे पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तातडीने अपघातस्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त मोटार रोडवरून बाजूला काढून जखमींना उपचारासाठी तत्काळ रुग्णालयात दाखल केले.
कोल्हापूर जिह्यातील नांदणी व वडगाव येथील पाच मित्र रविवारी मोटारीतून तुळजाभवानीच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शनानंतर सोलापूरकडून महामार्गाने कोल्हापूरकडे येत होते. वाटेत सांगोल्याजवळील चिंचोली बायपासवर त्यांच्या भरधाव मोटारीने मालट्रकला धडक दिली. या अपघातात मोटारीतील दोघेजण उडून बाहेर फेकले गेले. तर चालक मोटारीत अडकून पडला होता.