रेल्वेमध्ये भेटलेल्या मुलीसोबत केला विवाह, अल्पवयीन असल्याने पोलिसांनी केली अटक

697

लांजा येथील महिलाश्रमातून पळून गेलेल्या अल्पवयीन मुलीसोबत बालविवाह करणाऱ्या सोलापूर येथील एका तरुणाला व त्याच्या मित्राला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला लग्नात मदत करणाऱ्या त्यांच्या मित्रांवर व कुटुंबीयांवर देखील लांजा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अटक करण्यात आलेल्या तरुणांना शनिवारी न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

लांजा महिलाश्रम येथून दि. ७ जानेवारी रोजी रात्री १.१५ वा . दरम्यान दोन मुली पळून गेल्या होत्या. या प्रकरणी महिलाश्रमाच्या प्रशासनाने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्या मुलींपैकी एका मुलीचा मित्र हा विजापूर येथील असल्याने लांजा पोलीस पथक विजापूर येथे दाखल झाले होते. मात्र सदरील मुली विजापूर येथे न गेल्याने पोलिसांना माघारी परतावे लागले. मुलींनी पळून जाण्यापूर्वी महिलाश्रमातील एका महिला कर्मचारीचा मोबाईल पळवला होता. त्या मोबाईल फोनवरून त्यांना ट्रॅक करण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. मात्र त्या सतत वेगवेगळ्या ठिकाणी जात असल्याने पोलिसांना त्यांना पकडता येत नव्हतं. मुलींनी प्रथम रेल्वेने पनवेल त्यानंतर कोल्हापूर, मिरज असा रेल्वेने प्रवास केला.

रेल्वेने मिरजहून प्रवास करीत असताना त्याच डब्ब्यात त्यांची दोन तरुणांशी ओळख झाली. बळीराम (उस्मानाबाद) व साजन (सोलापूर) अशी त्या मुलांची असून दोघे उस्मानाबाद व सोलापूर जिल्ह्याचे रहिवासी होते. त्या दोघांशी बोलताना मुलींनी त्यांच्या घरी कोणीच नसल्याचे त्यांना सांगीतल्याने. बोलता बोलता त्यांच्यात मैत्री झाली. बळीराम व साजन या दोघांनीही मुलींना स्वत:च्या घरी नेण्याचे ठरवले. दोन मुलींपैकी 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी साजन सोबत गेली तर बळीराम याच्या बरोबर 15 वर्षीय मुलगी गेली.

साजन याच्या घरी गेल्यानंतर त्याने कुटुंबीयांना मुलीबाबत सांगून त्यांना विश्वासात घेतले. त्यानंतर कुटुंबीयांनी साजन व त्या मुलीचे लग्न लावून दिले. दरम्यान तो मोबाईल साजन सोबत गेलेली मुलगी घेऊन गेली होती. त्यामुळे पोलिसांनी तिला ट्रॅक केले. लांजा पोलिस स्थानकाचे पोलीस हेडकॉन्स्टेबल उदय धुमास्कर, धनाजी सुतार, सुनिल पडळकर, शांताराम पंदेरे, दिपाली भोपळे यांचे पथक सोलापूर झाले. येथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने दि 17 जानेवारी रोजी रात्री 10.30 वा. त्यांनी दोन्ही मुली व त्यांच्यासोबतच्या दोन्ही तरुण बळीराम व साजन यांना ताब्यात घेतले. साजन याने अल्पवयीन मुलीशी विवाह केल्याने त्याच्या तसेच त्याचा मित्र व कुटुंबातील एकूण 5 जणां विरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे . या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक श्वेता पाटील या करीत आहेत .

आपली प्रतिक्रिया द्या