आमदारांच्या राखीव डब्यात चोरी, 2 आमदारांची कागदपत्रे, पैसे चोरले

242

सामना ऑनलाईन, मुंबई

दोन आमदाराकडे असलेली महत्वाची कागदपत्रे आणि पैसे  चोरीला गेल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली आहे. इतकंच नाही तर एका आमदाराच्या पत्नीची पर्सही हिसकावून चोरट्याने लांबवली आहे. हा सगळा प्रकार कल्याण ते ठाणे दरम्यान घडल्याने या प्रकाराचे गांभीर्य आणखीनच वाढले आहे.

सध्या राज्याच्या विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी काही आमदार त्यांच्या मतदारसंघातून सकाळी मुंबईत पोहोचले. चिखली मतदार संघाचे आमदार राहुल बोन्द्रे मलकापूर येथून विदर्भ एक्सप्रेसने कल्याणला आले. त्यांच्या पत्नी वृषाली बोंद्रे यादेखील त्यांच्यासोबत प्रवास करत होत्या. बोंद्रे हे सकाळी 7 च्या सुमारास कल्याण स्थानकात उतरले यावेळी त्यांच्याकडच्या महत्वाच्या कागदपत्रांची फाईल चोरट्याने लांबवली. वृषाली बोंद्रे यांच्याकडे असलेली पर्सही चोरट्याने पळवली. राहुल बोंद्रे यांनी चोरट्याला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र तो पळून जाण्यात यशस्वी झाला. वृषाली यांच्या पर्समध्ये 26 हजार रूपये आणि एटीएम कार्ड होते.

आमदार संजय रायमूलकर आणि शशिकांत खेडेकर हे जालना येथून देवगिरी एक्स्प्रेसने  मुंबईला पोहचले. रायमूलकर हे कल्याण स्टेशनला उतरणण्यासाठी सकाळी उठले तेव्हा त्यांचा मोबाईल आणि खिशातील 10 हजार गायब असल्याचं त्यांना दिसलं. शशिकांत खेडेकर यांची बॅग असल्याचं समजून चोरट्याने त्यांच्या पीएची बॅग ब्लेडने फाडली. या दोन्ही घटनांची तक्रार आमदारांनी लोहमार्ग पोलिसांत केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या