हैदराबादमध्ये इसिसच्या दोन संशयित दहशतवाद्यांना अटक

सामना ऑनलाईन । हैदराबाद

राष्ट्रीय तपास पथकाने रविवारी सकाळी इसिस या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून दोघांना हैदराबादमधून अटक केली आहे. मोहम्मद अब्दुल्लाह बसीत आणि मोहम्मद अब्दुल कादीर अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. या दोघांची चौकशी सुरू आहे.

देशभरात विविध ठिकाणी घातपात घडवून आणण्याचा त्यांचा कट होता, अशी माहिती यंत्रणेला मिळाली होती. त्यानंतर पथकाने रविवारी त्यांना अटक केली. इसिसशी संबंध असलेल्या तिघांना दोन वर्षांपुर्वी नागपूर विमानतळावरून अटक करण्यात आली होती. याच गटाच्या संपर्कात बसीत आणि कादीर होते. त्यानंतर हे दोघे तपास पथकाच्या रडारवर आले होते. हैदराबादमधील सात ठिकाणी राष्ट्रीय तपास पथकाने नुकतीच छापेमारी केली होती. या कारवाईत आठ संशयितांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून लॅपटॉप, मोबाइल जप्त करण्यात आले होते.