एअर इंडियाच्या विमानात बॉम्बच्या अफवेप्रकरणी दोघांना सहार पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यातील एक जण अल्पवयीन आहे. त्याला बाल न्यायालयात हजर केले होते तर दुसऱ्याची कसून चौकशी सुरू आहे. नेमक्या कोणत्या कारणास्तव त्याने ते अफवेचे ट्विट केले होते याचा शोध सहार पोलीस घेत आहेत.
एअर इंडियाच्या न्यूयॉर्कला जाणाऱ्या विमानामध्ये बॉम्ब असल्याचा फोन आल्यानंतर वैमानिकाशी संपर्क साधून ते विमान दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरवण्यात आले. याप्रकरणी सहार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. परिमंडळ 8 चे पोलीस उपायुक्त मनीष कलवानीया यांनी अधिकाऱ्यांना तपासाच्या सूचना दिल्या. तपासासाठी एक पथक तयार करण्यात आले.
तपासादरम्यान पोलिसांना महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांचे पथक राज नांदवाला येथे गेले. तेथील गुडाखू लेन येथून दोघांना ताब्यात घेतले. त्यातील एक अल्पवयीन मुलगा आहे. त्या दोघांना ताब्यात घेऊन मुंबईत आणण्यात आले. पोलीस एकाची कसून चौकशी करत आहे.