कराड नगरपालिकेच्या अधिकार्‍याला धक्काबुक्की; कर्मचाऱ्यांकडून घटनेचा निषेध

कराड नगरपालिकेचे नगर रचनाकार रोहन ढोणे माहिती अधिकारातील माहिती व्यवस्थित देत नसल्याच्या कारणाने दोन जणांनी त्यांनी धक्काबुक्की केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणानंतर त्या दोघांवर शासकीय कामात अडथळा आणल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे.

नगरपालिकेतील नगर रचनाकार रोहन ढोणे यांना शहरातील धैर्यशील कराळे, जालिंदर वाघमारे यांनी माहिती अधिकाराखाली माहिती मागवली होती. संबंधितांना कारण देत माहिती देता येत नसल्याचे पत्र त्यांना पाठवण्यात आले होते. ते पत्र पाहून संबंधित धैर्यशील कराळे याने ढोणे यांना अर्वाच्च भाषेत फोनवरून शिवीगाळ केली. त्यानंतर ढोणे कार्यालयातील काम संपवून सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घरी निघाले असता धैर्यशील कराळे, जालिंदर वाघमारे यांनी ढोणे यांना धक्काबुक्की केल्याची घटना घडली आहे.
याबाबतची माहिती पालिका कर्मचारी, अधिकाऱ्यांना मिळताच ढोणे यांच्यासह सुमारे दोनशे कर्मचाऱ्यांचा जमाव पोलीस ठाण्यात दाखल झाला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी जमावाला शांत करून योग्य ती कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिले. या प्रकरणातील आरोपी धैर्यशील कराळे, जालिंदर वाघमारे यांना शुक्रवारी न्यायालयामध्ये हजर केले असता न्यायालयाने त्यांना 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे.

कराड नगरपालिका नगररचना विभागातील सहायक अधिकारी रोहण ढोणे यांना झालेल्या मारहाणीचे शुक्रवारी नगरपालिकेत तीव्र पडसाद उमटले. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनेचा तीव्र निषेध केला. यापुढे असा प्रकार झाल्यास काम बंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. नगरपालिका अधिकार्‍याला झालेल्या मारहाणीचा निषेध करण्यासाठी नगरपालिकेत अधिकारी व कर्मचारी जमले होते. यावेळी त्यांनी निषेधाच्या घोषणा दिल्या. मारहाण करणारी प्रवृत्तीच्या विरोधात पोलिसांनी कडक कारवाई करावी. गुन्हे दाखल करून त्यांना अटक करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. माहिती अधिकाराचा गैरवापर करणार्‍यांचा धिक्काराच्या घोषणा देण्यात आल्या.