प्रशिक्षण अकादमीचे विमान कोसळून दोन पायलट जखमी झाल्याची घटना मध्य प्रदेशातील गुना येथे घडली आहे. जखमी पायलट्सना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने ही दुर्घटना घडल्याचे बोलले जात आहे. एका खासगी विमान प्रशिक्षण अकादमीचे हे विमान होते.
दोन आसनी विमान उड्डान केल्यानंतर 40 मिनिटांनी दुर्घटनाग्रस्त झाले. दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली, असे गुना कँट पोलीस स्टेशनचे प्रभारी दिलीप राजोरिया यांनी सांगितले. कॅप्टन व्ही. चंद्र ठाकूर आणि पायलट नागेश कुमार अशी जखमींची नावे आहेत. दोन्ही पायलट हैदराबादचे रहिवासी आहेत.
अपघातग्रस्त विमान कर्नाटकातील बेळगाव एव्हिएशन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे आहे. हे विमान चाचणी आणि देखभालीसाठी या अकादमीमध्ये आणण्यात आले होते. कॅन्ट पोलिसांसह अकादमीचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.