हादीपोरा चकमकीत दोन दहशतवादी ठार

बारामुल्ला जिल्ह्यातील हादीपोरा भागात सुरक्षा दलांनी आज चकमकीअंती दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. या चकमकीत स्पेशल ऑपरेशन ग्रुपचा एक जवान आणि एक पोलीस जखमी झाला आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये चार दहशतवादी हल्ले झाले आहेत. या हल्ल्यांत 9 भाविक आणि 1 सुरक्षा कर्मचारी मारले गेले होते, तर 1 नागरिक आणि सात सुरक्षा कर्मचारी जखमी झाले आहेत. यामुळे सुरक्षा दलांनी मोठी शोधमोहीम हाती घेतली आहे.

हादीपोरामध्ये पोलीस आणि लष्कराच्या संयुक्त पथकानेही दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम सुरू केली होती. हे पथक दहशतवाद्यांनी आश्रय घेतलेल्या ठिकाणी पोहोचताच दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला आणि चकमकीला तोंड फुटले.

बांदीपोरात एलईटी कमांडर ठार
याआधी सोमवारी (17 जून) सकाळी सुरक्षा दलांनी बांदीपोरात दहशतवादी एलईटी कमांडर उमर अकबर लोन ऊर्फ जाफरला ठार केले. तो पट्टणचा रहिवाशी होता. या परिसरात 2 ते 3 दहशतवादी अद्यापही लपले असण्याची शक्यता असून त्यांच्या शोधासाठी लष्कराची शोधमोहीम सुरू आहे.