कुडाळमधील दोन महिलांचा प्रामाणिकपणा

424

नेरूर येथील अमित सुरेश मार्गी या युवकाकडील कुडाळ एमआयडीसी परिसरात मोटरसायकलहून पडलेली 1 लाख रूपयांच्या रोख रकमेची पिशवी लक्ष्मी शिंगाडे, आनंदी झोरे या दोन महिलांना मिळाली. त्यांनी कुडाळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधून पोलिसांना ती सूपूर्द केली. ती रक्कम मार्गी यांना देण्यात आली. या महिलांच्या प्रामाणिकपणाबाबत त्यांचे सर्वत्र कौतूक होत आहे.

अमित मार्गी हा कुडाळ एमआयडीसीत एका कंपनीत नोकरीला आहे. मोटरसायकलने शनिवारी एमआयडीसी येथून कुडाळला येत असताना त्याच्या मोटरसायकलीच्या टिकीत ठेवलेली एक लाख रुपये रोख रक्कम असलेली पिशवी रस्त्यावर पडली. याबाबतची तक्रार मार्गी यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दिली. ही पिशवी लक्ष्मी शिंगाडे, आनंदी झोरे या महिलांना सापडली. त्यांनी कुडाळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक शंकर कोरे यांच्याशी संपर्क साधत याबाबत माहिती दिली. ती रक्कम घेऊन त्या सोमवारी कुडाळ पोलीस ठाण्यात आल्या. रक्कम गहाळ झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल आहे का, याबाबतची माहिती घेतल्यावर अमित मार्गी यांचे पैसे गहाळ झाल्याच्या तक्रारीची नोंद होती. त्यानंतर मार्गीला संपर्क करून पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले. ती रक्कम पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांच्या उपस्थितीत मार्गीकडे सुपूर्द केली. लक्ष्मी शिंगाडे व आनंदी झोरे या दोन्ही महिलांनी प्रामाणिकपणा दाखविल्याबद्दल पोलिस निरीक्षक कोरे यांनी त्यांचे कौतूक केले.

आपली प्रतिक्रिया द्या