कश्मीरात पुन्हा टार्गेट किलिंग, बिहार आणि उत्तर प्रदेशच्या दोघांची हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी गेल्या काही दिवसांपासून सामान्य नागरिकांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. आज दहशतवाद्यांनी श्रीनगरच्या ईदगाह भागात बिहारच्या पाणीपुरीवाल्याला डोक्यात गोळी मारली. तर आणखी एका घटनेत पुलवामामध्ये मूळच्या उत्तर प्रदेशच्या मेस्त्रीवर गोळय़ा झाडण्यात आल्या. या दोघांचाही मृत्यू झाला आहे.

अरविंद कुमार साह असे बिहारच्या पाणीपुरीवाल्याचे नाव आहे. दुसरा हल्ला यूपीच्या सागिर अहमदवर करण्यात आला. तो मेस्त्रीकाम करायचा. या दोन्ही हल्ल्यानंतर हिंदुस्थानी जवानांनी भाग घेरला असून दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे.

तीन दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-कश्मीरमध्ये दोन पोलीस कॉन्स्टेबलच्या हत्येमध्ये सामील असलेला लश्कर-ए-तोयबाचा मोस्ट वॉण्टेड दहशतवादी उमर मुश्ताक खांडे आज सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत ठार झाला. पुलवामाच्या पंपोरमध्ये सुरक्षा दलांनी खांडे याच्यासह अन्य दोन दहशतवाद्यांना ठार केले आहे.

दोन जवानांचे पार्थिव सापडले

गुरुवारी पुंछमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत हिंदुस्थानी लष्कराचे नायक हरेंद्र सिंह आणि सुभेदार अजय सिंह हे दोन जवान बेपत्ता झाले होते. लष्कराच्या शोधमोहीमेत आज या दोघांचेही पार्थिव सापडले. यामुळे या चकमकीतील शहीद जवानांची संख्या 9 झाली आहे.