
सामना ऑनलाईन । मुंबई
लोकलमध्ये स्टंटबाजी करणाऱ्या दोघांना वडाळा रेल्वे पोलिसांनी अटक केली. मोहम्मद मुस्तफा आणि समीर अहमद अली अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांना शुक्रवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.
सकाळी वडाळा रेल्वे पोलीस ठाण्याचे सचिन पाटील आणि सचिन मांडले हे कामावर येत होते. त्यांनी कुर्ला येथून वडाळ्याला जाणारी लोकल पकडली तेव्हा मोहम्मद आणि समीर हे दरवाजाजवळ उभे राहून स्टंटबाजी करत होते. पाटील आणि मांडले यांनी त्या दोघांना स्टंट करू नकोस असे सांगितले तेव्हा मोहम्मद आणि समीरने या पोलिसांना उलट उत्तरे दिली. पोलिसांनी स्टंटबाजीचा प्रकार मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. वडाळा रेल्वे स्थानकात आल्यावर त्या दोघांना लोकलमधून खाली उतरवले. चौकशीकरिता वडाळा रेल्वे स्थानकात आणले. स्टंटबाजीप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल केल्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र पाल यांनी सांगितले. ऍप्सवर प्रसिद्धी मिळावी तर कधी मौजेकरिता अल्पवयीन मुले आणि युवक हे हार्बर लाईनवरच्या लोकलमध्ये जीवघेणे स्टंट करतात. जीवघेण्या स्टंटचा व्हिडिओ व्हायरल करतात.


























































