UAE मध्ये सत्ताबदलाचे संकेत, राष्ट्राध्यक्षांनी मुलाकडे सोपवली २६० अब्ज डॉलरची संपत्ती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

यूएईमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. यूएईचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद यांनी आपले सुपुत्र आणि क्राउन प्रिन्स शेख खालिद यांच्याकडे तब्बल २६० अब्ज डॉलरची (सुमारे २१ लाख कोटी रुपये) संपत्ती सोपवली आहे. या निर्णयामुळे यूएईमध्ये लवकरच अधिकृतपणे सत्तांतर होऊन शेख खालिद देशाची धुरा सांभाळतील, अशी चर्चा जागतिक स्तरावर रंगली आहे.

वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालानुसार, नाहयान कुटुंबाची एकूण संपत्ती सुमारे ३३५ अब्ज डॉलर इतकी आहे. यापैकी मोठा हिस्सा म्हणजेच २६० अब्ज डॉलर आता क्राउन प्रिन्स खालिद यांच्या नियंत्रणाखाली आला आहे. एका रात्रीत घेतलेल्या या निर्णयामुळे खालिद यांच्याकडे भविष्यातील ‘सर्वोच्च नेता’ म्हणून पाहिले जात आहे.

कोण आहेत शेख खालिद?

  • शेख खालिद हे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद बिन झायेद यांचे ज्येष्ठ चिरंजीव आहेत.
  • १९८२ मध्ये जन्मलेल्या खालिद यांनी अमेरिकेतील जॉर्जटाउन युनिव्हर्सिटीमधून राज्यशास्त्राचे शिक्षण पूर्ण केले आहे.
  • २०१६ मध्ये त्यांनी सुरक्षा प्रमुख म्हणून राजकारणात प्रवेश केला.
  • २०२३ मध्ये त्यांची अधिकृतपणे ‘क्राउन प्रिन्स’ (युवराज) म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

सत्तांतराची घाई का?

तज्ज्ञांच्या मते, हा निर्णय यूएईमधील अंतर्गत सत्तासंघर्ष आणि प्रादेशिक राजकारणामुळे घेतला असावा. सध्या नाहयान कुटुंबात सत्तेवरून काही प्रमाणात कलह सुरू असल्याची चर्चा आहे. राष्ट्राध्यक्षांचे धाकटे भाऊ आणि सुरक्षा प्रमुख शेख तहनून बिन झायेद यांचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी जवळचे संबंध आहेत. तसेच तहनून हे सौदी अरेबियाच्या क्राउन प्रिन्सच्याही जवळचे मानले जातात. अशा परिस्थितीत आपल्या मुलाची (खालिद) सत्ता निर्विवाद राहावी आणि भविष्यात कोणताही धोका निर्माण होऊ नये, यासाठी राष्ट्राध्यक्षांनी ही मोठी पाऊले उचलल्याचे बोलले जात आहे.