आयपीएलच्या बी प्लॅनमधून यूएईचा पत्ता कट; बीसीसीआयची द. आफ्रिका व श्रीलंकेला पसंती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. त्यामुळे हिंदुस्थान क्रिकेट नियामक मंडळा (बीसीसीआय)ने आयपीएलच्या आयोजनासाठी बी प्लॅन आखायला सुरुवात केली आहे. मात्र या बी प्लॅनमधून ‘बीसीसीआय’ने यूएईचा पत्ता कट केला असून दक्षिण आफ्रिका पिंवा श्रीलंका या दोन देशांत आयपीएलच्या 15 व्या हंगामासाठी फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे. गतवर्षी बीसीसीआयने आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेचे हिंदुस्थानातच आयोजन केले होते. मात्र अनेक खेळाडूंना कोरोना झाल्यामुळे ही स्पर्धा अर्ध्यावर स्थगित करण्यात आली. त्यानंतर काही महिन्यांनी बीसीसीआयने यूएईत या स्पर्धेच्या दुसऱया टप्प्याचे आयोजन केले. आता जगभरात कोरोनाची तिसरी लाट उसळली आहे. त्यामुळे बीसीसीआय आयपीएलसाठी वेगवेगळ्या योजना आखायला सुरुवात केली आहे. एप्रिलपर्यंत हिंदुस्थानातील कोरोनाची परिस्थिती सुधारली नाही तर बीसीसीआय पुन्हा एकदा परदेशात या स्पर्धेचे आयोजन करू शकते. मात्र यावेळी ही स्पर्धा यूएईमध्ये होणार नाही. बीसीसीआयच्या प्लॅन बीमध्ये यूएईला स्थान देण्यात आलेले नाही.