
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने शुक्रवारी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. लाडक्या बहिणी आणि तरुण बेरोजगारांना दरमहा 3 हजार रुपये, सत्ता येताच 6 महिन्यांमध्ये समान नागरी कायदा लागू करणे आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 45 दिवसांमध्ये सातवा वेतन आयोग लागू करण्याची घोषणा भाजपने केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हा जाहीरनामा प्रसिद्ध केला.
#WATCH | Kolkata: Union Home Minister Amit Shah says, “Within 45 days, the Government will complete the task of making available to the Ministry of Home Affairs all the land required by it… We will once again take forward schemes such as the PM Vishwakarma Yojana, PM KUSUM… pic.twitter.com/10pmRTQeXQ
— ANI (@ANI) April 10, 2026
तृणमूल काँग्रेसच्या कारभाराला कंटाळलेला बंगाल आता बदल करू इच्छित आहे. डाव्या आघाडीच्या त्रासातून मुक्त होण्यासाठी जनतेने ममता बॅनर्जींना कौल दिला होता, मात्र त्यांनी जनतेचा विश्वासघात केला आहे. ममता बॅनर्जी यांना जनतेने सलग तिसऱ्यांदा सत्तेवर बसवले. पण ज्या आशेने जनतेने त्यांना जनादेश दिला होता, त्यावर त्यांचे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे, असा हल्लाबोल अमित शहा यांनी केला. बंगालची जनता यावेळेस भाजपला पाच वर्षांसाठी सरकार स्थापन करण्याची संधी नक्कीच देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
जाहीरनाम्यातील ठळक गोष्टी –
– बेरोजगार तरुणांना दरमहा 3 हजार रुपये
– सहा महिन्यात समान नागरी कायदा
– पोलीस दलासह सर्व सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण
– महिलांना दरमहा 3 हजार रुपये, 75 लाख करोडपती दीदी बनवण्याचे उद्दिष्ट
– गर्भवती महिलांना 21 हजार रुपये आणि 6 पोषण कीट
– राज्य परिवहन बसमधून सर्व महिलांना मोफत प्रवास
– कोलकाता मेट्रोचे 100 टक्के विद्युतीकरण
– शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे 200 दिवसात हटवणार
– राज्यात 4 नवीन एमआयडीसी उभारणार
दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. 23 एप्रिल आणि 29 एप्रिल रोजी मतदान होईल, तर 4 मे रोजी निकाल लागणार आहे.





























































