तुमच्यासाठी बेळगावी असेल, आमच्यासाठी ते बेळगावच आहे – उदय सामंत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तुमच्यासाठी बेळगावी असले तरी आमच्यासाठी ते बेळगावच आहे,आणि बेळगाव हे महाराष्ट्राचेच आहे, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हा संपर्क मंत्री उदय सामंत यांनी कर्नाटकला ठणकावले आहे. बेळगावमध्ये बसून महाराष्ट्रातील लोकांना आव्हान देऊ नये, असा इशाराही त्यांनी दिला आहे. तारीख,वेळ तुम्हीच सांगा, शिवसैनिक म्हणून मी सीमाभागात येतो, असे आव्हान सामंत यांनी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांना दिले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

स्वतःचे पद पक्षाकडे मजबूत करण्यासाठीच सवदी यांनी केलेले वक्तव्य अत्यंत बालीशपणाचे असल्याची टीकाही मंत्री उदय सामंत यांनी केली. चीन,पाकिस्तान बॉर्डरवर घुसखोरी करून होणारे हल्ले कोणाला रोखता येत नाही. मात्र, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात 1 नोव्हेंबर रोजी सीमा सील करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातील मराठी भाषिकांना सीमाभागात जाऊ देण्यात येत नाही. तर सीमाभागातील मराठी भाषिकांचे कार्यक्रम बंद केले जात आहेत. त्याचा तीव्र निषेध व्यक्त करून सीमावासीयांच्या काळा दिनात महाराष्ट्रातील सर्व मंत्री काळ्या फिती बांधून सहभागी झाले आहेत, असे त्यांनी सांगितले. आम्ही सर्वजण सीमावासीयांच्या पाठिशी ठाम उभे असल्याचेही सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले.