शिमगोत्सव साधेपणाने साजरा करा; उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांचे आवाहन

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे ‘मी जबाबदार’ या मोहिमेअंतर्गत दोन्ही जिल्ह्यात सर्वांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर करताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात शिमगोत्सवासाठी मोठ्या संख्येने चाकरमानी दाखल होतात. शिमगा सण साधेपणाने साजरा करावा. ग्रामीण भागातील क्रीडा स्पर्धा आणि स्नेहसंमेलन थांबवावीत, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केले. विनापरवाना जे सार्वजनिक कार्यक्रम करतील, त्यांच्यावर कडक कारवाई करू, असा इशारा त्यांनी ऑनलाईन पत्रकार परिषदेत दिला.

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी झुम अ‍ॅपद्वारे आयोजित पत्रकार परिषदेत कोकणवासियांनी कोरोना नियमावलीचे पालन करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, लॉकडाऊन करायचे की नाही याबाबत पुढील आठ दिवसात निर्णय घेऊ, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी सांगितले आहे. त्यानंतर आज जिल्ह्यातील प्रमुख अधिकार्‍यांच्या उपस्थितीत कोरोनाचा आढावा घेतल्याची माहिती सामंत यांनी दिली.

ते पुढे ते म्हणाले की, नगरपरिषद, ग्रामपंचायत, महसूल विभाग आणि पोलिसांना विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार दिले आहेत. विनामास्क फिरणाऱ्यांवर 500 रुपये दंडात्मक कारवाई केली जाईल. 11 ते पहाटे 6 पर्यंत नागरिकांनी घरातून बाहेर पडू नये. तरी रात्रीची संचारबंदी करण्याबाबत चर्चा सुरू आहे. जिल्हाधिकारी यावर निर्णय घेतील. ही वेळ येऊ नये, यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन उदय सामंत यांनी केले. तसेच क्रीडा स्पर्धा आणि स्नेहसंमेलने थांबविण्याची विनंती केली आहे.

यापुढे जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल होणार्‍या कोरोनाबाधित रूग्णांच्या नातेवाईकांची चाचणी करण्यात येणार आहे. खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या सर्दी, ताप आजाराच्या रुग्णांची माहिती घेतली जाणार आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवताना एका रुग्णामागे 16 ऐवजी 20 रुग्ण तपासले जातील, अशी माहिती सामंत यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या