महसूल विभाग शासन आणि जनता यामधील महत्वाचा दुवा, मंत्री उदय सामंत यांची प्रतिपादन

महसूल विभागाची नाळ ही शेतकरी तसेच ग्रामीण जनता यांच्याशी जोडलेली असल्याने हा विभाग शासन आणि जनता यामधील महत्वाचा दुवा आहे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले. आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित महसूल दिन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. बी.एन.पाटील, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड, प्रांताधिकारी विकास सूर्यवंशी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष उदय बने आदी मान्यवर उपस्थित होते.

नैसर्गिक आपत्ती, निवडणूक अशा वेळी महसूल विभागातील कर्मचारी नेहमीच कार्यतत्पर असतात पंरतु कोव्हीड महामारीच्या कालावधीत महसूलच्या कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्याचे सामंत यांनी सांगितले. निसर्ग व तौक्ते चक्रीवादळ तसेच नुकत्याच झालेल्या पूरपरिस्थितीत कोतवालापासून ते जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत आपला जीव धोक्यात घालून महसूल विभागाने काम केले, अशा शब्दात मंत्रीमहोदयांनी महसूल विभागाचा गौरव केला. मंत्री उदय सामंत यांनी महसूल दिनानिमित्त महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. बी.एन.पाटील म्हणाले, महसूल विभाग हा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचणारे खाते आहे. कोणत्याही विभागाची कोणतीही योजना राबविण्यात महसूल विभागाचे सहकार्य असते. महसूल विभाग हा शासनाचा कणा आहे. आपल्याला वेगवेगळया माध्यमातून जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली आहे त्यामुळे आपल्याकडे येणाऱ्या नागरिकांचे प्रश्न सकारात्मक दृष्टिकोन ठेवून नियमात राहून व अभ्यासपूर्ण पध्दतीने सोडवा, असे आवाहन जिल्हाधिकारी पाटील यांनी कर्मचाऱ्यांना केले.

आपल्या प्रास्ताविकात निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड यांनी सांगितले, शासनाकडून येणाऱ्या नवनवीन योजना व प्रकल्पाचे नेतृत्व महसूल विभाग करते. कायदा सुव्यवस्था, आपत्ती व्यवस्थापन, धान्य पुरवठा, जमिनीविषयक बाबी इत्यादी विविध कामे महसूल विभागामार्फत केली जातात. जिल्ह्यातील सातबारा संगणकीकरण पूर्ण झाल्याची माहितीही त्यांनी आपल्या प्रास्ताविकात दिली.

महसूल दिनानिमित्त आपली जबाबदारी व कर्तव्ये उत्कृष्टपणे पार पाडून उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जिल्हयातील अधिकारी कर्मचाऱ्यांचा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रारंभी जिल्ह्यात आलेला पूर व दरड दुर्घटनेमधील मृतांना श्रध्दांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाला महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या