असे बोलण्यापेक्षा मेलेले बरे – उदयनराजे भोसले

2037
udayanraje-bhosale

गडकिल्ल्यांचे सुशोभीकरण आवश्यक  आहे, मात्र या ठिकाणी हॉटेल, परमिट रूम आदींना माझा विरोध कायम आहे. गडकिल्ल्यांवर डान्स बार करण्याला परवानगी द्यायला हवी असे मी कसे म्हणेन! असे मी बोललोच नाही. असे बोलण्यापेक्षा मेलेले बरे असेही उदयनराजे म्हणाले. वाईत एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

उदयनराजे म्हणाले, “गडकिल्ल्यांच्या बाबतीत महाराष्ट्रातील समाजाच्या ज्या भावना आहेत त्याच माझ्या भावना आहेत. किल्ल्यांमुळे स्वराज्याची संकल्पना साकार होऊ शकते, इतिहास जिवंत राहतो. गडकिल्ल्यांचा विकास झाला पाहिजे. परदेशामध्ये ज्याप्रमाणे या ऐतिहासिक वास्तूंची व गडकिल्ल्यांची जाहिरात होते, या ठिकाणी अनेक लोक भेट देतात तशा पद्धतीने या गडकिल्ल्यांचा विकास व जाहिरात व्हायला हवी; परंतु त्याचे पावित्र्य कायम राखणे गरजेचे असल्याचे मत उदयनराजे यांनी व्यक्त केले.

या गडकिल्ल्यांवर डान्स बार करण्याला परवानगी द्यायला हवी असे मी कसे म्हणेन! असे मी बोललोच नाही. असे बोलण्यापेक्षा मेलेले बरे. असे होणार असेल तर तो वेडेपणाच आहे. मी जे बोललो नाही त्याचे खापर माझ्यावर का फोडतात? अशा पद्धतीची बातमी आली असेल तर यापुढे मी पत्रकारांशी बोलणारच नाही. गडकिल्ल्यांच्या प्रदर्शनातून स्थानिकांना मोठा रोजगार मिळेल. त्यांना रोजगारासाठी इतरत्र जावे लागणार नाही.” शासनालाही महसूल मिळेल अशा अनुषंगाने त्या पत्रकारांच्या प्रश्नावर वक्तव्य केले, परंतु त्याचा विपर्यास करण्यात आला, असेही ते म्हणाले.

निवडणुकीच्या शेवटच्या काळात नसलेले मुद्दे उपस्थित केले जातात आणि असलेले मुद्दे अडगळीत जातात. मी कोणाला घाबरत नाही; परंतु नको असलेल्या विषयांवर मी नको ती चर्चा करणार नाही, केली तर मला कधीही, कोणीही, कुठेही विचारू शकतो; परंतु भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर मी मात्र ठाम आहे. नको ती वक्तव्ये मी टाळतो आहे, असेही उदयनराजे भोसले म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या