
मी शिवसेनेमुळे आमदार झालो, त्यामुळे मी शिवसेनेशी गद्दारी करणार नाही. मला शंभर कोटी रुपये दिले तरी मी शिवसेना सोडणार नाही, असा ठाम निर्धार कन्नड तालुक्याचे आमदार उदयसिंग राजपूत यांनी केला आहे.
शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या अन्य 11 आमदारांना सूरतमध्ये नेण्यात आल्यानंतर राज्यात अभूतपूर्व गोंधळ उडाला. विधानपरिषदेचे मतदान संपल्यानंतर डिनरसाठी जायचे सांगून अनेक आमदारांना वेगवेगळ्या वाहनांनी सूरतला नेण्यात आले. या आमदारांमध्ये कन्नड तालुक्याचे आमदार उदयसिंग राजपूत देखील असल्याचं वृत्त काही वाहिन्यांवर प्रसारित झालं.
मात्र, विधान परिषदेचं मतदान असल्याने आपला फोन बंद होता, त्यामुळे प्रसार माध्यमांमध्ये चुकीच्या बातम्या प्रसारित झाल्या, असं उदयसिंग राजपूत यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं. तसंच मी जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्यासोबत वर्षा बंगला येथे आहे. मला शिवसेनेने उमेदवारी दिली आणि मी आमदार झालो. मला गद्दारी करायची नाही. मला शंभर कोटी रुपये दिले तरी मी शिवसेना सोडणार नाही. ज्या पक्षाने मला आमदार केलं, त्या पक्षाची आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सोडणार नाही, असा ठाम निर्धार राजपूत यांनी व्यक्त केला. तालुक्यातील जनता आणि शिवसैनिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.


























































