हिंदी सक्तीविरोधातील ठाकरे बंधूंची भूमिका योग्यच; एम. के. स्टॅलीन यांनी केले कौतुक

राज्य सरकारने हिंदी सक्ती मागे घेतल्यानंतर मुंबईतील वरळी येथे विजय मेळावा साजरा करण्यात आला. या मेळाव्यातून मराठीची शक्ती आणि एकजूट दिसून आली. या मेळाव्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली. या भूमिकेचे तामिळनाडूचे मुखअयमंत्री एम.के. स्टॅलीन यांनी कौतुक केले आहे. ही भूमिका योग्य असल्याचे ते म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराज की जय! जय भवानी जय शिवाजी! कोण आला रे कोण आला, महाराष्ट्राचा वाघ आला! आवाज कुणाचा? मराठीचा!!! अशा गगनभेदी घोषणांनी आणि ढोल ताशांच्या आवाजाने मुंबईचा वरळी भाग दणाणून सोडला होता. हिंदी सक्तीवर मराठी जनांच्या शक्तीने मिळवलेल्या विजयाचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मराठी जनांची पाऊले मुंबईच्या दिशेने वळली. महाराष्ट्रातील विविध पक्षाचे नेते, मराठी साहित्यिक, मराठी कलाकार, विविध क्षेत्रांतील मराठी मान्यवरांनी कार्यक्रमास विशेष उपस्थिती लावली. या मेळाव्यातील उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मांडलेल्या भूमिकेचे सर्वत्र स्वागत होत आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलीन यांनीही या भूमिकेचे कौतुक केले आहे.

एम. के. स्टॅलीन यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, आज मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विजय मेळाव्यातली ऊर्जा आणि प्रभावी वक्तृत्व, आम्हाला हिंदी लादण्याविरोधात प्रचंड उत्साह देत आहे. हिंदी आणि संस्कृतच्या प्रचाराला पूर्णवेळ प्राधान्य देणाऱ्या केंद्र सरकारकडे राज ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला कोणतेही उत्तर नाही, हे आपल्याला माहिती आहे. उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये तिसरी भाषा कोणती शिकवली जाते? या प्रश्नाचे सरकारकडे कोणतेही उत्तर नाही. हिंदीमुळं नष्ट झालेल्या भाषांचा इतिहास विसरून काहीजण पोपटासारखे हिंदीमुळं नोकऱ्या मिळतात असं म्हणत असतात. मात्र, आता ही परिस्थिती बदलण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले आहेत.

हिंदी सक्तीने लादण्याला विरोध म्हणून द्रविड मुन्नेत्र कळघम (DMK) आणि तमिळनाडूतील जनतेने पिढ्यानपिढ्या चालवलेली भाषिक अधिकारांची लढाई, आता राज्यांच्या सीमांना ओलांडून महाराष्ट्रात आंदोलनाच्या वादळात रूपांतरित होत आहे. तमिळनाडूतील शाळांमध्ये तिसऱ्या भाषेच्या रूपाने हिंदी शिकवली गेली, तरच निधी वाटप करू, अशा बेकायदेशीर आणि असंवैधानिक भूमिकेत असलेल्या भाजपने, ते सत्तेत असलेल्या महाराष्ट्रात जनतेच्या उठावास घाबरून दुसऱ्यांदा माघार घेतली आहे.

हिंदी लादण्याविरोधात मुंबईत आज उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली झालेली विजय मिरवणूक, आणि त्या मिरवणुकीत उमटलेली घोषणाबाजी, जबरदस्त ऊर्जा देणारी होती. उत्तर प्रदेशात आणि राजस्थानात तिसरी भाषा कोणती शिकवली जाते?” आणि “हिंदीभाषक राज्ये मागे आहेत – मग हिंदी न बोलणाऱ्या पुढारलेल्या राज्यांवर हिंदी का लादत आहात?” असे राज ठाकरे यांनी विचारलेले सवाल, हिंदी व संस्कृतला संपूर्ण प्राधान्य देणाऱ्या केंद्र सरकारकडे उत्तर नाही, हे मला माहीत आहे.

“त्रैभाषिक धोरण” या नावाखाली हिंदी – संस्कृत लादणाऱ्या नव्या शैक्षणिक धोरणाला स्वीकारल्याशिवाय ‘समग्र शिक्षा अभियान’अंतर्गत 2,152 कोटी रुपयांचा निधी दिला जाणार नाही, हा तमिळनाडूविरुद्धचा सूडबुद्धीचा प्रयत्न केंद्र सरकार थांबवेल का? तमिळनाडूतील शाळकरी मुलांच्या शिक्षणासाठी कायद्याने द्यायचा असलेला निधी तात्काळ मुक्त करेल का?

हिंदीच्या वर्चस्वाविरोधात तमिळ जनता चालवत असलेला संघर्ष केवळ भावनिक नाही – तो बौद्धिक आहे, तार्किक आहे, आणि देशाच्या बहुभाषिक, बहुसांस्कृतिक रचनेचं रक्षण करण्यासाठी आहे! तो कोणत्याही द्वेषातून प्रेरित नाही! हिंदी लादण्यामुळे अनेक भारतीय भाषा कशा नामशेष झाल्या, याचा इतिहास माहिती नसल्याने, आणि भारताला एक ‘हिंदी राष्ट्र’ बनवण्याचा केंद्राचा हेतू न समजल्याने, “हिंदी शिकल्यासच नोकरी मिळते” या भ्रामक विधानांवर विश्वास ठेवणारे काही भोळे लोक, तरी आता शहाणे व्हायला हवेत. महाराष्ट्रातील उठाव त्यांच्या डोळ्यांत अक्कल आणेल!

तमिळ भाषेसाठी निधी वाटपात होत असलेला अन्याय, आणि कीळाडी नागरीकरणाच्या ऐतिहासिक महत्त्वाला नाकारण्याचा अहंकार आम्ही चालवून घेणार नाही. तमिळ आणि तमिळनाडूविरुद्ध भाजपने दाखवलेला धोका भाजपने भरून काढला पाहिजे – नाहीतर, तमिळनाडू त्यांना आणि त्यांच्या नव्या भागीदारांना पुन्हा एकदा न विसरता येणारा धडा शिकवेल! चला एकत्र येऊया! तमिळनाडू लढत आहे! तमिळनाडू जिंकेल! असे स्टॅलीन यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.