सरकारला मराठी लोकांनी नमवलं, आम्ही तुमच्या वतीनं…! राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचं संयुक्त पत्र

राज्य सरकारने पहिलीपासून हिंदी सक्तीचा निर्णय घेतला होता. या विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मिळून लढा दिला आणि सरकारला नमवलं. त्यामुळे राज्य सरकारला हा निर्णय मागे घ्यावा लागला होता. आता या निर्णयाचा विजोयत्सव साजरा करण्याचे दोन्ही पक्षांनी आवाहन केले आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी संयुक्त पत्र लिहून मराठी जनांना आवाहन केले आहे.

या पत्रात म्हटले आहे की, आवाज मराठीचा ! मराठी मातांनो, भगिनींनो आणि बांधवांनो, सरकारला नमवलं का ? तर हो नमवलं…! कोणी नमवलं तर ते तुम्ही, मराठी जनांनी नमवलं ! आम्ही फक्त तुमच्या वतीने संघर्ष करत होतो. त्यामुळे हा आनंद साजरा करतानासुद्धा, आम्ही फक्त या मेळाव्याचे आयोजक आहोत, बाकी जल्लोष तुम्ही करायचा आहे. वाजत गाजत या, जल्लोषात, गुलाल उधळत या !! आम्ही वाट बघतोय… !
आपले नम्र
राज ठाकरे – उद्धव ठाकरे

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी हे पत्र सोशल मीडियावर पोस्ट करून याबाबत माहिती दिली आहे.