यांना एकदाच असा धक्का देऊ की पुन्हा कधी दिसता कामा नये; उद्धव ठाकरे गरजले

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज ‘मातोश्री’ येथे शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांना धक्का असे म्हणणाऱ्यांना त्यांनी खास ठाकरे शैलित, ‘यांना एकदाच असा धक्का देऊ की पुन्हा हे कधी दिसता कामा नये’, असे म्हणत खरपूस शब्दात समाचार घेताला. शिवसैनिकांशी बोलताना ते म्हणाले की, सध्या देशात जपानसारखी परिस्थिती झाली आहे. कारण जपानमध्ये एखाद्या दिवशी भूकंपाचा धक्का बसला नाही तर लोक आश्चर्य व्यक्त करतात. तसं रोज उद्धव ठाकरेंना धक्का देत आहेत. आता मी धक्का पुरुष झालो आहे. असे किती कोण धक्के देतंय ते बघुया. यांना एकदाच असा धक्का देऊ की पुन्हा हे कधी दिसता कामा नये, असे म्हणत उद्धव ठाकरे गरजले.

हा संवाद सुरू असताना, ‘ही लढाई एकट्याची नाही. ही लढाई आपली आहे. आणि जे-जे भेटताहेत त्या सर्वांना मी मुद्दाम सांगतोय, छावा चित्रपट अवर्जून बघा. चित्रपट बघून लोक डोळे पुसत बाहेर येत आहेत, असा रिपोर्ट आहे. डोळे पुसत नुसते बाहेर पडून का, डोळे उघडून चित्रपट बघा. मात्र, आता ही लढाई ही एकट्याची नाही. आपल्या मुळावरती घाव घालणारे कसे सरसावले आहेत आणि आपल्याच लाकडाचा दांडा करून त्याची कुऱ्हाड बनवून हे शिवसेनेच्या म्हणजेच मराठी माणसाच्या मुळावर घाव घालण्याचा प्रयत्न करत आहेत’, असा हल्ला उद्धव ठाकरे यांनी चढवला.

संघटनात्मक बांधणी करण्याचे आताचे दिवस आहेत. मुंबई महापालिकेच्या जागा 227 की 236 यावर येत्या काही दिवसांत कोर्टाचा निकाल लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर एप्रिल-मे मध्ये निवडणूक लागण्याची दाट शक्यता आहे. त्यानुसार आपल्याला जो काही वेळ मिळाला आहे, प्रत्येक शाखेत आपआपली जबाबदारी घ्या. मतदार नोंदणी तपासा. सदस्य नोंदणी करा, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केल्या. गेल्या विधानसभा निवडणुकीत जो काही अनुभव आला, तो लक्षात घेता जी काही चूक झाली आहे ती चूक पुन्हा होणार नाही, याची मला खात्री असल्याचे म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना कामाला लागण्याचे आवाहन केले.